Pushkar Singh Dhami On Kumbh Mela : उत्तराखंडमधील हरिद्वारच्या गंगा घाटांवर २०२७ मध्ये अर्धकुंभमेळा पार पडणार आहे. त्यासाठी उत्तराखंड सरकार आतापासून मोठी तयारी करत आहे. या अर्धकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी एक मोठे संकेत दिले आहेत.
हरिद्वारमध्ये २०२७ मध्ये पार पडणाऱ्या अर्धकुंभमेळ्यात बिगर हिंदू व्यक्तींना प्रवेशबंदी करण्यात येण्याचा प्रस्ताव उत्तराखंड सरकारच्या विचाराधीन असल्याचे संकेत मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिले आहेत. पुष्कर सिंह धामी यांनी एका मुलाखतीत या कुंभमेळ्याबाबत बोलताना हे भाष्य केल्याचं इंडियन एक्स्प्रेसने एका वृत्तात म्हटलं आहे.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी काय म्हणाले?
२०२७ मध्ये कुंभमेळा होणार आहे. त्या अनुषंगाने श्री गंगा सभेचे अध्यक्ष नितीन गौतम यांनी कुंभमेळ्यात बिगर हिंदूंना प्रवेश देण्यास बंदी घालण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीनंतर दुसऱ्या दिवशी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, “या विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि योग्य त्या उपाययोजना अंमलात आणणार आहोत. सरकार योग्य तोडगा काढण्यासाठी संबंधित पुजाऱ्यांशी आणि व्यक्तींशी चर्चा करेल. हरिद्वार हे हिंदू धर्माचं मध्यवर्ती ठिकाण आहे आणि ते गंगा नदीच्या काठावर आहे. आम्ही त्यानुसार उपाययोजना करत आहोत.”
दरम्यान, गंगा घाटाचे व्यवस्थापन करणाऱ्या सभेचे अध्यक्ष नितीन गौतम यांनी म्हटलं की, “आता आपल्याला पुढील १०० वर्षांसाठी नियोजन करण्याची आवश्यकता आहे. ज्या लोकांचा आपल्या धर्म, संस्कृती आणि भावनांशी फारसा संबंध नाही. कारण हा सनातनचा सर्वात मोठा उत्सव आहे, जो उज्जैन, प्रयागराज, नाशिक आणि हरिद्वार या ठिकाणी आयोजित केला जातो. मात्र, या कुंभमेळ्यात बिगर-हिंदूंच्या प्रवेशामुळे आपलं काही नुकसान होणार नाही. त्यामुळे कुंभमेळ्यात फक्त हिंदूंनाच प्रवेश दिला गेला पाहिजे अशी आमची मागणी आहे.”

