Meghalaya Vidhan Sabha CM Vs Wife : देशातील अनेक राज्यांत सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सभागृहात अनेकदा जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळतं. मात्र, आता मेघालयच्या विधानसभेत पती-पत्नीमध्ये सभागृहात प्रश्नोत्तराची जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं. या आगळ्या-वेगळ्या प्रसंगाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नॅशनल पीपल्स पार्टीच्या आमदार मेहताब चांदी ए संगमा यांनी मुख्यमंत्री कॉनराड के संगमा यांना महत्त्वाच्या पशुधन शिक्षण प्रकल्पांच्या विलंबाबद्दलच्या संदर्भातील प्रश्न विचारले. पत्नीच्या प्रश्नावर मुख्यमंत्री कॉनराड के संगमा यांनीही आश्वासन देत या प्रकल्पाची प्रक्रिया जलद पूर्ण केली जाईल असं आश्वासन दिलं.
दरम्यान, सभागृहातील प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच आमदार पत्नीने विधानसभेत विविध मुद्यांवरून घेरल्याचं पाहायला मिळालं. तसेच सभागृहात पती-पत्नीमध्ये प्रश्नोत्तराची जुगलबंदी रंगल्याचा अनोखा प्रसंग पाहायला मिळाला.
आमदार मेहताब यांनी मुख्यमंत्र्यांना काय विचारलं?
मंगळवारी मेघालय विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान आमदार मेहताब संगमा यांनी राज्य सरकारला पशुधन शिक्षण संस्था स्थापन करण्यात होणाऱ्या विलंबाबाबत प्रश्न विचारला. आमदार मेहताब संगमा यांनी एका पशुवैद्यकीय महाविद्यालय, दोन मत्स्यपालन महाविद्यालय आणि एका दुग्ध महाविद्यालयाच्या प्रगतीबद्दल स्पष्टीकरण मागितलं.
मुख्यमंत्र्यांनी काय उत्तर दिलं?
यावर उत्तर देताना या संस्थांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. तसेच या संस्थांमध्ये पशुवैद्यकीय व्यावसायिकांची कमतरता असल्याचं त्यांनी मान्य केलं. तसेच सरकारच्यावतीने उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, पशुधन क्षेत्राला बळकटी देण्यासाठी या संस्थांची योजना आखण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेबाबत चिंता व्यक्त करत ते म्हणाले की, “ही चिंतेची बाब आहे. मनुष्यबळाची कमतरता लवकरात लवकर दूर करण्यासाठी पावले उचलली जात आहेत.”

