कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे म्हणजे ४० लाखांचे मनगटी घड्याळ वापरणारे भ्रष्ट नेते आहेत अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली. त्यांच्या हातातले मनगटी घड्याळ हा त्यांच्या भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा पुरावा आहे असेही अमित शहा यांनी म्हटले आहे. कर्नाटकमधील शिमोगात अमित शहा यांची सभा झाली. त्यावेळी त्यांनी हा खळबळजनक आरोप केला.

आज दुपारीच अमित शहा यांनी एका शेतकऱ्याच्या घरी जेवण केले आणि त्यानंतर त्याच्या घरी पान सुपारीही खाल्ली. सुपारी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांकडे कर्नाटक सरकारने दुर्लक्ष केल्याचीही टीका अमित शहा यांनी केली. युपीएच्या काळात सुपारी उत्पादक शेतकऱ्यांसाठी कोणीतीही नीती आखण्यात आली नाही. देशात सुपारीच्या पूर्ण उत्पादनाच्या तुलनेचा विचार केला तर अर्धे उत्पादन कर्नाटकात होते मात्र यूपीएच्या काळात याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुपारी उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुपारीचे किमान मूल्य निर्धारित केले. तसेच सुपारीच्या आयातीवर आयात शुल्कही लावले. काँग्रेसच्या काळात सुपारी उत्पादकांचे नुकसान झाले मात्र ते भरून काढण्यााठी आम्ही पूर्ण प्रयत्न केले असेही शहा यांनी म्हटले आहे.

सिद्धरामय्या यांचे सरकार विकासाला खिळ घालणारे सरकार आहे. मागील ५ वर्षात कर्नाटकचा विकास थांबला आहे. आपल्या राज्याचा विकास व्हावा ही इच्छाशक्तीच सिद्धरामय्या यांच्यात नाही. त्यामुळेच अनेक आघाड्यांवर कर्नाटकचा विकास झालाच नाही. सिद्धरामय्यांनी फक्त स्वतःचा सार्थ साधला. त्यांच्या हातात असलेले घड्याळ हे त्यांच्या स्वार्थाचे सगळ्यात मोठे उदाहरण आहे. जो माणूस ४० लाखांचे मनगटी घड्याळ वापरतो त्याने किती भ्रष्टाचार केली असेल याची कल्पनाच केलेली बरी असेही शहा यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने देशातील दारिद्र्यरेषेखाली जगणाऱ्या लोकांसाठी जवळपास ११२ योजना आखल्या आहेत. मात्र यापैकी एकही योजना सिद्धरामय्यांनी कर्नाटकच्या जनतेपर्यंत पोहचवली नाही असाही आरोप अमित शहांनी केला. सिद्धरामय्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयांना जनता निवडणुकांमध्ये उत्तर देईल आणि भाजपाचीच सत्ता कर्नाटकात येईल असेही शहा यांनी म्हटले आहे.