CM Vijay floor test victory updates: तमिळनाडू विधानसभेत बुधवारी झालेल्या विश्वासदर्शक ठरावादरम्यान तमिळगा वेत्री कळघम (TVK) सरकारला १४४ आमदारांचं पाठबळ मिळालं. फ्लोअर टेस्टच्या कामकाजादरम्यान काँग्रेस, सीपीआय(एम), व्हीसीके आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग (आययूएमएल) यांनी विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकारला पाठिंबा दिला. तर, AIADMK च्या बंडखोर आमदारांनीही विजय यांना पाठिंबा दिला आहे.

काँग्रेसने आपल्या पाच आमदारांसह सरकारला पाठिंबा दिला, तर सीपीआय(एम), व्हीसीके आणि आययूएमएल या पक्षांच्या प्रत्येकी दोन आमदारांनीही समर्थन दिलं. अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम (AMMK) मधून हकालपट्टी झालेले आमदार एस कामराज यांनीही सरकारच्या बाजूने मतदान केले, परिणामी युतीचे संख्याबळ १२० जागांवर पोहोचले. हे विधानसभेतील बहुमताच्या आकड्यापेक्षा खूप जास्त आहे. तर, ‘बंडखोर’ नेते षन्मुगम आणि एसपी वेळुमणी यांच्या नेतृत्वाखालील अण्णाद्रमुक (AIADMK) पक्षातील ४७ पैकी किमान २५ आमदारांनी मुख्यमंत्र्यांच्या बाजूने मतदान केले.

विरोधकांचा सभात्याग

मात्र, द्रमुक (DMK) आणि डीएमडीके (DMDK) आमदारांनी सभात्याग केल्यामुळे आणि पीएमकेच्या (PMK) चार आमदारांनी व भाजपाच्या एका आमदाराने मतदानावर बहिष्कार टाकला होता.

ही तर जनतेची युती

तमिळनाडू विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर, मुख्यमंत्री विजय यांनी सभागृहाला संबोधित केले आणि फ्लोअर टेस्टदरम्यान तमिळगा वेत्री कळघम (TVK) सरकारला पाठिंबा देणाऱ्या सर्व पक्षांचे आणि आमदारांचे आभार मानले. या युतीला “मक्कल युती” (जनतेची युती) असे संबोधून विजय यांनी ठामपणे सांगितले की, त्यांचे सरकार जातीय राजकारणाने प्रेरित नाही आणि समाजातील प्रत्येक घटकासाठी काम करेल. हे सरकार केवळ त्यांना मतदान करणाऱ्यांचेच नाही, तर निवडणुकीत त्यांना विरोध करणाऱ्यांचेही आहे. टीव्हीके सरकार सुशासनावर लक्ष केंद्रित करेल आणि तमिळनाडूतील जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करेल”

जोसेफ विजय यांना ६५ टक्के मतदारांनी नाकारलं

द्रमुक (DMK) नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सांगितले की, विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके सरकारवर तीक्ष्ण हल्ला चढवत तमिळनाडू विधानसभा विश्वासदर्शक ठरावा दरम्यान पक्ष मतदानापासून दूर राहील. फ्लोअर टेस्टच्या चर्चेदरम्यान बोलताना उदयनिधी यांनी दावा केला की, टीव्हीके निवडणुकीत स्पष्ट जनमत मिळवण्यात अयशस्वी ठरली आहे आणि सत्तेत राहण्यासाठी निवडणूक निकालानंतरच्या युतीवर अवलंबून आहे. जवळपास ६५ टक्के मतदारांनी विजय यांना मुख्यमंत्री म्हणून नाकारले आहे आणि टीव्हीके प्रमुखांवर “जनतेवरील विश्वास गमावल्याचा” आरोप केला.

उदयनिधी स्टॅलिन यांनी विजय यांच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, मुख्यमंत्र्यांकडे मूलभूत प्रामाणिकपणा नाही आणि विश्वासदर्शक ठरावाच्या कामकाजादरम्यान घोडेबाजार झाला आहे.

अण्णाद्रमुकमधील फूट उघड

या विश्वासदर्शक ठरावाने अण्णाद्रमुक (AIADMK) पक्षांतर्गत सरचिटणीस एडप्पाडी के पलानीस्वामी (EPS) यांच्या नेतृत्वाखालील गट आणि ज्येष्ठ नेते एसपी वेळुमणी व सी व्ही षन्मुगम यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर गट यांमधील नाट्यमय फूट उघड केली आहे. ईपीएस गटाने विश्वासदर्शक ठरावाला विरोध केला असतानाच, अण्णाद्रमुकमधील एका गटाने विधानसभा कामकाजादरम्यान विजय यांना उघडपणे पाठिंबा दर्शवला, यामुळे सभागृहात गदारोळ पाहायला मिळाला.

विधानसभेत जेव्हा एसपी वेळुमणी बोलण्यासाठी उभे राहिले, तेव्हा ईपीएस गटाच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला, यामुळे सभागृहात निदर्शने झाली. मात्र, सभापतींनी वेळुमणी यांना बोलणे सुरू ठेवण्याची परवानगी दिली. त्यानंतर वेळुमणी यांनी एक राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण वक्तव्य केले, ज्याने अण्णाद्रमुकमधील फुटीवर शिक्कामोर्तब केले. “आम्ही जनमताचाआदर करतो”, असं ते म्हणाले. त्यामुळे त्यांनी विजय यांना अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याचं स्पष्ट होतंय.

राजकीय समीकरणे बदलणार?

या विश्वासदर्शक ठरावाने तामिळनाडूच्या राजकारणातील बदलणारी समीकरणेही समोर आणली आहेत. पीएमके (PMK) मतदानापासून दूर राहिली, तर भाजपाचे एकमेव आमदार भोजराजन यांनी तटस्थ भूमिका घेतली. द्रमुकचे (DMK) मित्रपक्ष एमजेके (MJK) आणि केएमडीके (KMDK) यांनी ईपीएस गटासोबत या ठरावाला विरोध केला.