CNG Car Blast Karjan NH48 News: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील एका सीएनजी पंपावर कारमध्ये गॅस भरत असताना अचानक सिलिंडरचा भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना १ ऑक्टोबर रोजी घडली. स्फोटाच्या वेळी वाहनात कोणीही प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, महामार्गावरील जिंदाल कंपनीसमोरील सीएनजी पंपावर मंगळवारी दुपारी ही घटना घडली. एका कारमध्ये सीएनजी भरण्याचे काम सुरू असताना अचानक वाहनाच्या गॅस टाकीचा जोरदार स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, कारच्या मागील भागाचा चक्काचूर झाला असून काचा आणि वाहनाचे सुटे भाग हवेत उडून अनेक मीटर अंतरावर जाऊन पडले.
इतर दोन वाहनांचेही नुकसान
स्फोटाच्या प्रचंड तीव्रतेमुळे पंपावर बाजूलाच उभ्या असलेल्या अन्य दोन वाहनांचेही मोठे नुकसान झाले. अचानक झालेल्या या स्फोटामुळे पंपावर उपस्थित कर्मचारी आणि वाहनचालकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आणि त्यानंतर एकच पळापळ झाली.
घटनेची माहिती मिळताच कर्जण नगरपालिकेचे अग्निशामक दल आणि स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंपावरील सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली असून, पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
सीएनजीचा स्फोट होण्याची कारणे काय?
पेट्रोल पंपावर सीएनजी भरत असताना अनेकदा स्फोट झाल्याचे प्रकार समोर येतात. या घटना घडण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. मात्र अतिरिक्त दाब, सिलिंडरची परिस्थिती, गॅस गळती अशा त्रुटींमुळे स्फोट होण्याची शक्यता वाढू शकते.
दैनिक भास्करने दिलेल्या बातमीनुसार, सीएनजी भरत असताना जर डिस्पेन्सिंग मशीन बिघडली आणि मर्यादेपेक्षा जास्त गॅस सिलिंडरमध्ये भरला गेला तर सिलिंडरची दाब सहन करण्याची क्षमता संपते आणि स्फोट होऊ शकतो. सीएनजी सिलिंडरची मुदत संपलेली असणे किंवा त्याला गंज लागणे किंवा तो कमकुवत झाला असेल तर दाब वाढून तो फुटू शकतो.
ईटीव्ही भारतने दिलेल्या वृत्तातील माहितीनुसार, पाईपलाईन किंवा व्हॉल्व्हमधून गॅस गळत असेल आणि पंपावर किंवा आजूबाजूला ठिणगी उडाली तर सिलिंडरचा स्फोट होऊ शकतो. मानक पाळले नसलेले सिलिंडर वापरले असेल तर ते दाब सहन करू शकत नाही, अशावेळी त्याचा स्फोट होण्याचा धोका उद्भवू शकतो.
काय काळजी घ्यावी?
आपल्या वाहनाच्या सीएनजी सिलिंडरची दर तीन ते पाच वर्षांनी हाइड्रो टेस्ट करून घेण्याचा पर्याय सांगितला जातो. तसेच सिलिंडर गाडीत भरत असताना सर्व प्रवाशांना गाडीतून खाली उतरण्याचा सल्ला दिला जातो.
