Oman Pilot wife niqab dispute Viral Post : फ्लायदुबई विमानामध्ये भारतीय वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप असलेला ओमानचा सह-वैमानिक हमाम अल-हम्मामी याच्या डिलिट केलेल्या सोशल मीडिया पोस्ट्सवरून त्याचे महिला, धर्म आणि स्त्री-पुरुष एकत्र काम करणाऱ्या ठिकाणांबद्दलचे विचार समोर आले आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने सीएनएनच्या वृत्ताच्या हवाल्याने वृत्त दिलं आहे.
या प्रकरणाशी परिचित असलेल्या अनेक सूत्रांचा हवाला देत सीएनएनने वृत्त दिलं आहे की, अल-हम्मामीने लग्नानंतर निकाब घालण्यास आणि नोकरी सोडण्यास तयार होणारी मुलगी शोधण्यात येणाऱ्या अडचणींचं वर्णन केलं होतं. दुसऱ्या एका डिलिट केलेल्या पोस्टमध्ये त्याने स्त्री-पुरुष एकत्र काम करणाऱ्या ठिकाणांच्या महिलांवरील प्रभावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अशा वातावरणात धार्मिक महिला बिघडू शकतात, असं त्याने लिहिलं होतं.
एआय-संचलित (AI-powered) सिमेंटिक सर्च मॉडेलचा वापर करून सीएनएनने २०२१ आणि २०२२ मधील ज्या सुमारे तीन हजार डिलिट केलेल्या ट्वीट्सचे विश्लेषण केले, त्यामध्ये या गोष्टी समोर आल्या आहेत. इस्रायली वृत्तसंस्था i24 ने देखील वृत्त दिलं आहे की, त्याच्याकडे कथितपणे इस्रायल-विरोधी साहित्य होतं. हा हल्ला दहशतवादी कारवायांशी संबंधित होता की ज्यू प्रवाशांना लक्ष्य करण्याच्या विशिष्ट हेतूने केला गेला होता, याचा तपास अधिकारी करत आहेत.
महिलांबद्दल अल-हम्मामीने काय पोस्ट केलं होतं?
सीएनएननुसार, फेब्रुवारी २०२२ मधील एका पोस्टमध्ये त्याने आपल्या आईने त्याच्यासाठी मुलगी शोधण्याच्या प्रयत्नांचा उल्लेख केला होता. त्याच्या अटींमध्ये मुलगी निकाब घालणारी असावी आणि लग्नानंतर तिने नोकरी सोडली पाहिजे, अशा अटी होत्या. पोस्टमध्ये दावा केला आहे की, अनेक मुलींच्या कुटुंबीयांनी या अटी नाकारल्या होत्या, परंतु त्याच्या आईने जेव्हा त्यांचा मुलगा वैमानिक (पायलट) असल्याचं सांगितलं, तेव्हा त्यांनी आपला विचार बदलला. ही पोस्ट नंतर डिलिट करण्यात आली.
जानेवारी २०२२ मधील दुसऱ्या एका पोस्टमध्ये अल-हम्मामीने स्त्री-पुरुष एकत्र काम करणाऱ्या नोकरीच्या ठिकाणांवर टीका केली होती आणि त्याचा महिलांवर काय परिणाम होतो यावर प्रश्न उपस्थित केला होता. सीएनएनने या डिलिट केलेल्या ट्विटर अकाउंटवर अत्यंत धार्मिक आणि महिलांविषयी आकस असणारे विचार असल्याचं म्हटलं आहे.
सीएनएनने असंही सांगितलं की, बुधवारच्या घटनेच्या सुमारे नऊ तासांनंतर अल-हम्मामीच्या नावे असलेल्या लिंक्डइन अकाउंटवर दोन पोस्ट दिसल्या होत्या. त्याने स्वतः या पोस्ट केल्या होत्या की त्या आधीच शेड्युल केल्या होत्या, हे स्पष्ट झालेलं नाही. यातील एका पोस्टमध्ये बोईंग ७३७ मॅक्स (Boeing 737 Max) विमानाचं कॉकपिट फुटेज आणि इस्रायली विमान कंपन्यांच्या विमानांची छायाचित्रे होती. या व्हिडिओच्या शेवटी अल-कायदाचा माजी नेता अयमान अल-जवाहिरी आणि २००९ मधील आत्मघाती बॉम्बस्फोट घडवून आणणारा हुमाम खलील अबू-मुलाल अल-बलावी यांची छायाचित्र होती.
दुसऱ्या पोस्टमध्ये मक्का, मदिना आणि जेरुसलेम या इस्लामच्या तीन पवित्र स्थळांचं एआय-निर्मित चित्र होतं आणि सोबतच अपमान नाकारणं, मृत्यूची भीती न बाळगणं आणि स्वतःच्या प्रतिष्ठेचे रक्षण करण्याबद्दलची एक कविता होती.
