scorecardresearch

Coal Scam: कोळसा घोटाळ्याच्या तपासातच घोटाळा, सीबीआय अधिकाऱ्याचा भ्रष्टाचाराचा आरोप

या प्रकारामुळे सीबीआयच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे

cbi, coal scam
सीबीआयचे संचालक अनिल सिन्हा संसद भवनातून बाहेर पडताना…

संपूर्ण देशभर गाजलेल्या कोळसा घोटाळ्याचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाच स्वीकारून तपासाची दिशाच बदलून टाकली असल्याचा गंभीर आरोप त्यांच्याच विभागातील एका अधिकाऱ्याने केला आहे. स्वतःचे नाव गोपनीय ठेवत या अधिकाऱ्याने सीबीआयचे संचालक अनिल सिन्हा यांना पत्र लिहिले असून, त्यांना यामध्ये तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली आहे. या प्रकारामुळे सीबीआयच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने हे वृत्त दिले आहे.
कोळसा घोटाळ्यात आरोप असलेल्या काही कंपन्यांकडून सीबीआयचे काही वरिष्ठ अधिकारी मोठ्या प्रमाणात लाच स्वीकारत असून, तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांवर खटला कमकुवत करण्यासाठी दबाव टाकला जातो आहे. संबंधित कंपन्यांविरूद्धचे पुरावेही कमजोर केले जात असल्याचे पत्र लिहिणाऱ्या अधिकाऱ्याने म्हटले आहे. ‘प्रामाणिक तपास अधिकारी, सीबीआय’ एवढाच उल्लेख पत्राखाली करण्यात आला आहे.
पत्रामध्ये दिलेल्या एका उदाहरणामध्ये, कोळसा घोटाळ्यातील एका खटल्यामध्ये आरोपी कंपनीविरुद्ध सुरुवातीला तपास बंद करीत असल्याचा अहवाल सादर करण्यात आला होता. पण संबंधित कंपनीच्या संचालकाने अधिकाऱ्यांना लाच देण्यास नकार दिल्यानंतर या खटल्याचा तपास पुन्हा सुरू करण्यात आला. कोर्टात सादर करण्यात आलेला क्लोजर रिपोर्टही परत मागे घेण्यात आला.
हे पत्र तीन पानी असून, ते मार्च महिन्यांच्या शेवटी अनिल सिन्हा यांच्या कार्यालयात पोहोचले आहे, अशी माहिती ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला मिळाली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-05-2016 at 10:28 IST

संबंधित बातम्या