कोळसा खाण वाटप घोटाळ्याप्रकरणी विशेष न्यायालयाने सोमवारी झारखंड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला आणि तिच्या दोन संचालकांना दोषी ठरवले. कोळसा खाण वाटप घोटाळ्यामध्ये दाखल असलेल्या विविध खटल्यांमध्ये पहिल्यांदाच विशेष न्यायालयाने निकाल दिला असून, एका कंपनीला आणि तिच्या संचालकांना दोषी ठरवले आहे.
आर. एस रुंगठा आणि आर. सी. रुंगठा या भावांना न्यायालयाने सोमवारी दोषी ठरवले. त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचे आणि गुन्हेगारी कट रचल्याचे आरोप ठेवण्यात आले होते. या दोन्ही आरोपांखाली कंपनीसह या दोघांना दोषी ठरविण्यात आले आहे. दोन्हीही रुंगठा बंधू जामीनावर बाहेर होते. पण न्यायालयाने त्यांना दोषी ठरविल्यावर पोलिसांनी त्यांना लगेचच ताब्यात घेतले आहे. या दोघांना येत्या गुरुवारी शिक्षा सुनावण्यात येणार आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. केंद्रीय अन्वेषण विभागाचे विशेष न्यायाधीश भारत पराशर यांनी हा निकाल दिला.
खटल्याच्या सुनावणीवेळी सर्व आरोपींनी आपल्यावरील आरोप फेटाळले होते. आपण निर्दोष असल्याचा युक्तिवाद त्यांच्या वकिलांकडून न्यायालयात करण्यात आला होता. या प्रकरणात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना बचाव पक्षाचे साक्षीदार म्हणून न्यायालयात बोलवावे, अशी मागणी रुंगठा यांच्या वकिलांकडून गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये करण्यात आली होती. पण न्यायालयाने ती फेटाळली होती.