Coal scam : कोळसा घोटाळाप्रकरणी माजी कोळसा सचिव गुप्ता आणि क्रोफा दोषी

याप्रकरणी बऱ्याच मंत्र्यांची नावंही समोर आली होती

coal scam
कोळसा घोटाळा

दिल्लीच्या विशेष न्यायालयाने शुक्रवारी कोळसा घोटाळाप्रकरणी माजी अधिकाऱ्यांवर गदा आणली. माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता यांना याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. त्यासोबतच याप्रकरणी न्यायालयाने माजी सहसचिव के. एस. क्रोफा, कोळसा मंत्रालयाचे माजी संचालक के. सी. सामरिया आणि इतर काही बड्या अधिकाऱ्यांनाही दोषी ठरवलं आहे. या प्रकरणातून सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाऊंटंट) अमित गोयल यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

मध्य प्रदेशातील रुद्रपूरमध्ये केएसएसपीएल कोळसा खाण प्रकरणी विश्वासघात आणि भष्टाचार केल्याप्रकरणी गुप्ता आणि क्रोफा यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं सरकार असताना कोळसा घोटाळ्याचा मुद्दा प्रकाशझोतात आला होता. दरम्यान, याप्रकरणाची उर्वरित सुनावणी २२ मे रोजी करण्यात येणार आहे. न्यायालयाने सध्या दिलेल्या निर्णयामध्ये गुप्ता, क्रोफा आणि सामरिया यांच्याव्यतिरिक्त ‘केएसएसपीएल’ कंपनी आणि व्यवस्थापकीय संचालक पवनकुमार अहलुवालिया यांनाही दोषी ठरवण्यात आलं आहे.

कोळसा घोटाळाप्रकरणी बऱ्याच अधिकाऱ्यांची आणि मंत्र्यांची नावं समोर आली होती. ज्यामध्ये सुबोधकांत सहाय, भाजप नेते अजय संचेती, काँग्रेस नेता विजय दर्डा, आरजेडी नेता आणि माजी मंत्री प्रेमचंद गुप्ता, जिंदाल स्टील अॅण्ड पॉवरचे अध्यक्ष नवीन जिंदाल यांच्या नावांचा समावेश होता.

वाचा: ‘कॅग’ची काळजी कोणाला?

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Coal scam special delhi court convicts former coal secretary hc gupta ks kropha