कायदामंत्री अश्वनीकुमार यांनी आपल्या कार्यालयाचा गैरवापर केला असल्याचे सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून स्पष्ट होत असल्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शुक्रवारी भारतीय जनता पक्षाने केली. या प्रकरणी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनीही राजीनामा द्यावा, अशीही मागणी पक्षाने केलीये.
कोळसा खाणवाटप घोटाळ्याची चौकशी करणाऱया सीबीआयचा स्थितीदर्शक अहवाल कायदामंत्री अश्वनीकुमार यांच्या मागणीनुसार त्यांना दाखविण्यात आला होता, असे प्रतिज्ञापत्र सीबीआयचे संचालक रणजित सिन्हा यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केले. पंतप्रधान कार्यालयातील सहसचिव स्तऱावरील अधिकारी आणि खाण मंत्रालयाकडेही हा अहवाल देण्यात आला होता, असेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
अश्वनीकुमार यांनी आपल्या कार्यालयाचा गैरवापर केला आहे. सीबीआयच्या अहवालात त्यांनी हस्तक्षेप करून अहवाल बदलला असल्याची टीका भाजपने केली. त्यांना पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नसून, त्यांनी लगेचच राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी पक्षाने केली.