नवी दिल्ली : शिक्षण व्यवस्थेतील अपयशांविरोधात प्रस्तावित असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपला विस्तार करण्याच्या उद्देशाने, ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (सीजेपी) तीन नव्या प्रवक्त्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. सोशल मीडियावर अल्पावधीत प्रचंड लोकप्रिय झालेल्या ‘सीजेपी’ने जाहीर केलेल्या प्रवक्त्यांमध्ये एका शोधपत्रकारासह, चित्रपट दिग्दर्शक आणि एका माजी मॅकेन्झी कन्सल्टंटचा समावेश आहे. भारताचा राजकीय दृष्टिकोन बदलण्यासाठी आणि नवीन पिढीच्या नेतृत्वाला पुढे आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे ‘सीजेपी’ने ‘एक्स’वर मंगळवारी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

कायदेविषयक आणि सामाजिक मुद्द्यांवर काम करणारे शोधपत्रकार सौरव दास यांची पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नोव्हेंबर २०२५मध्ये इंडिया गेट येथे झालेल्या प्रदूषणविरोधी आंदोलनात सौरव दास यांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे सीजीपीचे ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजित दिपके यांनी एक्स वरील पोस्टमध्ये लिहिले आहे.

राजकीय अभ्यासक, लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक विजेता दहिया आणि लंडनचे माजी व्यवस्थापन सल्लागार (मॅकिन्से कन्सल्टंट) आशुतोष रांका यांचीही पक्षाचे अधिकृत प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विजेता दहिया हे दिल्ली तंत्रज्ञान विद्यापीठचे (डीटीयू) पदवीधर असून त्यांनी पॉवर ऑफ युनिव्हर्स सारखी पुस्तके आणि हरियाणवी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तिसरे प्रवक्ते आशुतोष रांका हे आयआयटी कानपूर आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे माजी विद्यार्थी असून ते गेल्या वर्षभरापासून जयपूरमध्ये तरुणांच्या विविध प्रश्नांवर जनआंदोलनात सक्रिय आहेत.

‘सीजेपी’चे संस्थापक दिपके हे ६ जूनला भारतात परतणार असून, त्यानंतर लगेचच या आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण आणि सीबीएसई बोर्डाच्या कारभारातील त्रुटींमुळे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी दिल्लीत शांततापूर्ण आंदोलन करण्याची घोषणा सीजीपीने आधीच केली आहे.

सोनम वांगचुक यांचा पाठिंबा

देशातील शिक्षण व्यवस्थेची ढासळती स्थिती आणि परीक्षांमधील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ५ जूनपर्यंत राजीनामा न दिल्यास ६ जूनला ‘सीजेपी’च्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचा इशारा प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी दिला. कोणत्याही स्वाभिमानी लोकशाहीत अशा अपयशानंतर शिक्षणमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देणे गरजेचे आहे असे, एक ध्वनिचित्रफीत संदेश जारी करत वांगचुक म्हणाले.