Cockroach Janata Party Delhi Jantar-Mantar-Protest : देशातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि परीक्षांमधील पेपर फुटीच्या प्रकरणांवरून ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने आक्रमक पवित्रा घेतला आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आज ‘कॉक्रोच जनता पार्टी’तर्फे दुसरे मोठे जनआंदोलन छेडण्यात आले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलकांनी ‘गो प्रधान गो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
‘थाळी-चमचा’ वाजवून अनोखा निषेध
आंदोलनापूर्वीच CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना सोबत ‘थाळी आणि चमचा’ आणण्याचे आवाहन केले होते. कोरोना काळातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘थाळी वाजवा’ आवाहनाचा दाखला देत दिपके यांनी सरकारवर खोचक टीका केली. “जंतर-मंतरवरील आंदोलनात सहभागी होणाऱ्या सर्व ‘कॉक्रोच’नी (समर्थकांनी) सोबत थाळी आणि चमचा घेऊन यावे, पुढील गोष्ट तुम्हाला माहितीच आहे,” असा व्हिडिओ दिपके यांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. आज दुपारी १ वाजल्यापासून सुरू झालेल्या या आंदोलनात दिल्ली आणि शेजारच्या राज्यांतून हजारो विद्यार्थी थाळी-चमचे वाजवत सरकारचा निषेध करताना दिसत आहेत.
पंतप्रधान मोदींना खुले पत्र आणि १ कोटींच्या भरपाईची मागणी
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक खुले पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी देशातील तरुण विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याविषयी आणि ढासळत चाललेल्या शिक्षण व्यवस्थेविषयी तीव्र चिंता व्यक्त केली.
“मी अत्यंत जड अंतःकरणाने हे पत्र लिहीत आहे. देशाचे भविष्य असणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. गेल्या महिनाभरापासून कॉक्रोच जनता पार्टी देशभरात आंदोलन करत आहे. आम्हाला केवळ सरकारकडून या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी आणि उत्तरदायित्व हवे आहे,” असे दिपके यांनी पत्रात नमूद केले.
गेल्या काही आठवड्यांत परीक्षांमधील घोळ आणि तणावामुळे ११ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा दिपके यांनी केला आहे. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना सरकारने तातडीने ₹१ कोटींची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. शिक्षण व्यवस्थेतील या गोंधळाला संपूर्णपणे जबाबदार धरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात यावी. अशा मागण्या पत्रात करण्याच आल्या आहेत.
आंदोलनाचा वाढता जोर
याआधी दिल्लीत झालेल्या आंदोलनाच्या तुलनेत आज जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. हातामध्ये ‘धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या’ अशा आशयाचे फलक घेऊन तरुण वर्ग रस्त्यावर उतरला होता. ‘Gen Z’ म्हणजेच आजच्या तरुण पिढीने चालवलेले हे आंदोलन आता देशभरात चर्चेचा विषय ठरत असून, सरकार यावर काय पाऊल उचलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
