Cockroach Janata Party Kolkata Meetup: कोलकाता मंगळवारी संध्याकाळी आयोजित करण्यात आलेला कॉक्रोच जनता पार्टीचा कार्यक्रम सभागृहाच्या मालकांनी माघार घेतल्याने रद्द करावा लागला. भाजपा नेत्यांच्या धमक्या आणि राज्य प्रशासनाकडून आलेला प्रचंड दबाव यामुळेच सभागृह मालकांनी हा निर्णय घेतला, असा गंभीर आरोप कॉक्रोच जनता पार्टीने केला आहे.

धमक्यानंतर कार्यक्रम रद्द केल्याचा आरोप

कॉक्रोच जनता पार्टीचे सह-संयोजक आशुतोष रांका यांनी एक्स वरील एका पोस्टमध्ये या घटनेची माहिती दिलीय. “उत्तर कोलकात्यातील भारत सभा हॉलमध्ये आमचा ‘कोलकाता मीट-अप’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु, भाजपा नेत्यांकडून धमक्या आल्यानंतर हॉलच्या मालकांनी हा कार्यक्रम रद्द केला,” असे रांका यांनी लिहिले आहे. तसेच इतर सभागृह मिळवण्याचा प्रयत्न केला असता, राज्य प्रशासनाचा प्रचंड दबाव आहे असे सांगून आणखी सहा सभागृह मालकांनी कार्यक्रम आयोजित करण्यास नकार दिला, असा दावाही त्यांनी केला.

भाजपा सरकार घाबरल्याची टीका

उत्तर कोलकात्यातील भारत सभा हॉल या सभागृहात सीजेपीने या बैठकीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला आशुतोष रांका स्वतः उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधणार होते. हा नियोजित कार्यक्रम रद्द होणे म्हणजेच पश्चिम बंगालमधील सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकार सीजेपीच्या वाढत्या प्रभावाला घाबरले असल्याचे स्पष्ट लक्षण आहे, असा दावा रांका यांनी केला. तसेच भविष्यात याहूनही अधिक भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रांका काय म्हणाले?

“या घटनेवरून हेच सिद्ध होते की भाजपा कॉक्रोच पक्षाला घाबरला आहे. बंगालमधील आमच्या कार्यकर्त्यांशी आणि समर्थकांशी संवाद साधण्याची संधी यावेळी हुकली असली, तरी लवकरच एका मोठ्या कार्यक्रम आयोजित करू,” असे रांका यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. पश्चिम बंगालमध्ये सीजेपीची स्कूल ठीक करो ही मोहीम सुरूच राहील, असा पुनरुच्चार रांका यांनी केला. आमचे कार्यकर्ते सरकारी शाळांना भेटी देत राहतील आणि शाळांची दुरावस्था सुधारण्यासाठी बंगाल सरकारवर दबाव आणत राहतील, असे रांका यांनी नमूद केले.