सोशल मीडियावर सध्या तुफान चर्चेत असलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) या सॅटायरिकल (व्यंग्यात्मक) डिजिटल चळवळीला तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. टीएमसीचे राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांनी ‘X’ वर पोस्ट करत ही माहिती दिली.
डेरेक ओब्रायन यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यासोबत आठवडाभर महत्त्वाच्या बैठका झाल्या. लोकशाहीची ही लढाई पूर्ण ताकदीने लढण्यावर दोघांचाही भर आहे. त्यांचा निर्धार अत्यंत पक्का आहे. आणि हो, त्या दोघांनीही ‘कॉक्रोच’ (कॉक्रोच जनता पार्टी) बद्दल आपले प्रेम आणि पूर्ण पाठिंबा व्यक्त केला आहे.”
काय आहे ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP)?
बोस्टनमध्ये राहणाऱ्या अभिजित दिपके यांनी १६ मे रोजी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या डिजिटल प्लॅटफॉर्मची स्थापना केली होती. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी एका सुनावणीदरम्यान बेरोजगार तरुणांची तुलना ‘कॉक्रोच’शी (झुरळ) केल्याचा आरोप झाला होता. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आणि त्यातूनच या उपरोधिक चळवळीचा जन्म झाला.
या डिजिटल ग्रुपच्या वेबसाईटनुसार, या पार्टीचे सदस्य होण्यासाठी व्यक्ती “बेरोजगार, आळशी, सोशल मीडियावर सतत सक्रिय असणारा आणि व्यावसायिक पद्धतीने सरकारवर टीका करण्याची क्षमता ठेवणारा” असणे गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनंतर ही वेबसाईट आता बंद करण्यात आली आहे.
NEET पेपरफुटीवरून आक्रमक, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
या डिजिटल ग्रुपने नुकतेच ‘NEET-UG 2026’ परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि शिक्षण क्षेत्रातील गोंधळावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत मोठे सोशल मीडिया आंदोलन छेडले होते. यामुळेच हा ग्रुप देशभरातील तरुणांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
सोशल मीडिया अकाउंट्सवर ‘क्रॅकडाऊन’चा आरोप
‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. आंदोलन दडपण्यासाठी त्यांचे मुख्य सोशल मीडिया अकाउंट्स ब्लॉक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दिपके यांच्या दाव्यानुसार, त्यांचा बॅकअप अकाउंट काही काळासाठी बंद करण्यात आला होता, तर त्यांचे वैयक्तिक इंस्टाग्राम अकाउंटही हॅक करण्यात आले होते. २१ मे रोजी या ग्रुपचे मुख्य ‘X’ अकाउंट भारतात ब्लॉक करण्यात आले. त्यानंतर त्यांनी ‘Cockroach is Back’ या नवीन नावाने नवीन अकाउंट सुरू केले असून, अवघ्या काही दिवसांत त्याला २ लाख २७ हजारहून अधिक युजर्सनी फॉलो केले आहे.
सोशल मीडियावरील मीम्स ठरताहेत राजकीय शस्त्र
केवळ एक उपरोधिक किंवा विनोदी (Satire) प्रयोग म्हणून सुरू झालेल्या या मोहिमेने आता डिजिटल आंदोलनाचे रूप घेतले आहे. देशातील बेरोजगारी, परीक्षांमधील पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवत हा ग्रुप धारदार राजकीय मीम्सच्या माध्यमातून तरुणांच्या संतापाला वाट करून देत आहे. आता ममता बॅनर्जी यांच्या पाठिंब्यामुळे या ‘डिजिटल लढाई’ला थेट राजकीय बळ मिळाले असून, येत्या काळात हा वाद अधिक पेटण्याची शक्यता आहे.
