नवी दिल्ली : गेल्या ७२ तासांत दिल्लीत घडलेल्या घटनांनी १९७५ च्या आणीबाणीची आठवण करून दिली आहे. शांततेने आंदोलन करून आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवू इच्छिणार्या नागरिकांविरुद्ध सरकारने नागरी युद्ध पुकारले आहे, असा आरोप कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) नेत्यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला.
केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची पोलिसांनी केलेली धरपकड आणि त्यांच्यावरील कारवाईवरून सीजेपीच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि दिल्ली पोलिसांवर तीव्र टीका केली. ‘‘ही लढाई आता कुठे सुरू झाली आहे. ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही,’’ असा निर्धार सीजेपीचे सहसंयोजक आशुतोष रांका आणि सौरव दास यांनी व्यक्त केला.
माफिया डॉनप्रमाणे उचलले!
* आम्हाला माफिया डॉनप्रमाणे उचलले; भ्रमणध्वनी जप्त करताना कायदेशीर प्रक्रियाही पाळली नाही,’ असा आरोप दास यांनी केला. ‘‘आम्हाला जंतर-मंतरवर शांततेने आंदोलन करायचे होते. मात्र, सरकारने दिल्लीला छावणीचे स्वरूप दिले. नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध, अशी स्थिती निर्माण करण्यात आली,’’ असा दावा रांका यांनी केला.
हुकूमशाहीचा अंत करणार– अभिजीत दिपके
नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली पोलिसांना गुंड करून ठेवले आहे. मात्र, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या हुकूमशाहीला घाबरणार नाही. त्यांच्या हुकूमशाहीचा अंत केल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, असा इशारा कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी नागपुरात दिला.
आजीच्या निधनानंतर हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिपरी या मूळ गावी जात असताना दीपके नागपूर विमानतळावर उतरले होते. त्या वेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दिल्ली पोलीस कारवाईच्या नावाखाली मुलींवर हात टाकत आहेत. असेच सुरू राहिले, तर ते पंतप्रधान मोदी, गृहमंत्री शाह यांच्या इशार्यावरून विद्यार्थ्यांचा खूनही करतील. त्यामुळे हुकूमशाही संपवावी लागेल, असे ते म्हणाले.
ज्या पोलिसांवर आरोप केले, त्यांना गृहमंत्री शाह यांनी पदोन्नती दिली. जेव्हा देश गुंड चालवतात, तेव्हा गुंड प्रवृत्तीलाच पदोन्नती दिली जाते, असा संतापही त्यांनी व्यक्त केला. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या वागणुकीवरही त्यांनी टीका केली. आजीच्या निधनामुळे माझे आई-वडील धक्क्यात होते. त्यांना अटकेचा दुसरा धक्का द्यावा, यासाठी रात्री साडेतीन वाजता दबाव टाकण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
अमित शहा यांच्या सांगण्यावरून अत्याचार?
* अमित शहा यांच्या सांगण्यावरून आंदोलकांवर अत्याचार केले जात असल्याचा दावाही सीजेपीने केला. आंदोलकांना मारहाण केल्याच्या आरोपांची मानवाधिकार आयोग, दिल्ली उच्च न्यायालयाने चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली.
* ‘‘मानवाधिकारांचे काय? आयोग कुठे आहे? उच्च न्यायालय कुठे आहे? आंदोलकांना ताब्यात घेऊन त्यांच्याशी कशी वागणूक दिली जात आहे, याची चौकशी कोण करणार?’’ असा सवाल या नेत्यांनी केला.
ज्ञानेश कुमार यांना का वाचवले जात आहे?
‘‘ज्ञानेश कुमार यांना सरकार एवढे का वाचवत आहे? त्यांच्याकडे अशी कोणती माहिती आहे की, त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाही केंद्र सरकार त्यांना हटवण्यास तयार नाही? तेरा कोटी मतदारांची नावे कशी कमी झाली?’’ असा सवाल सीजेपीच्या नेत्यांनी केला. गेल्या लोकसभा निवडणुकीतील वाराणसी मतदारसंघाच्या निवडणूक प्रक्रियेवरही सीजेपीच्या नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले. या मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक लढवली होती.
