मतदार याद्यांची विशेष सखोल तपासणी मोहिम रद्द करण्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीनं पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. CJP ने येत्या ७ नोव्हेंबर रोजी मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व अभिजीत दिपके स्वतः करणार आहेत. त्यांच्यासोबत CJP चे दक्षिण विभाग प्रमुख विजय मल्लांगी आणि राष्ट्रीय सचिव आफ्रीन नवाज हेदेखील या आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत.
“लोकशाही वाचवा! SIR रद्द करा! ७ नोव्हेंबर, दुपारी ४ वाजता राजेंद्र मैदान, कोची येथे एकत्र या,” असे आवाहन कॉक्रोच जनता पार्टीनं आपल्याX पोस्टद्वारे केलं आहे. “कोचीमध्ये जंतर मंतर” या शीर्षकाखाली हे आंदोलन ७ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता केरळमधील कोची येथील ‘राजेंद्र मैदान’ येथे पार पडणार असून पक्षाच्या अधिकृत ‘X’ (ट्विटर) हँडलवरून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
दिल्लीतील अटकेनंतर पहिलंच मोठं आंदोलन
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि मतदार याद्यांच्या विशेष पुनरीक्षण प्रक्रियेविरोधात दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करण्याचा प्रयत्न करताना CJPच्या प्रमुख नेत्यांना अटक झाली होती. त्या घटनेनंतर CJP चे हे पहिलेच मोठे आणि महत्त्वाचे आंदोलन मानले जात आहे. मागील महिन्यात अभिजीत दिपके यांच्यासह आशुतोष रांका आणि सौरव दास यांना दिल्ली पोलिसांनी जंतर मंतरवर परवानगीशिवाय आंदोलन करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ताब्यात घेतले होते.
जंतर मंतर बंदी आणि पोलिसांची कारवाई
या आंदोलनानंतर प्रशासनाने जंतर मंतर हे आंदोलनाचे ठिकाण म्हणून असलेली मान्यता रद्द केली होती. मात्र, या निर्णयाचा निषेध नोंदवण्यासाठी सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी सुरक्षेचे कडे तोडून जंतर मंतर येथे तिरंगा फडकवला. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर जंतर मंतरवर पुन्हा आंदोलन न करण्याचे हमीपत्र दिल्यानंतर आठवड्याभराने त्यांची सुटका झाली.
दरम्यान, १ नोव्हेंबर रोजी दिल्लीत इंडिया आघाडीने काढलेल्या मोर्चाला CJP ने पाठिंबा दिला होता; मात्र रामलीला मैदानावर राहुल गांधी यांच्या नेतृत्वात झालेल्या सभेत दिपकेंनी थेट सहभाग घेतला नव्हता. आता कोचीमधील या आंदोलनाद्वारे CJP पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहे.
