Sourav Das Puducherry Police Inquiry: कॉक्रोच जनता पार्टीचे नेते सौरव दास यांच्या घरी पद्दुचेरी पोलिसांनी जात कुटुंबीयांची चौकशी केल्याचा आरोप केला आहे. या चौकशीचे आदेश कोणी दिले? अशा प्रकारचा छळ कशासाठी? असे प्रश्न उपस्थित करत दास यांनी हे केंद्र सरकारकडून आदेश देण्यात आल्याचा आरोप केला. पण, पद्दुचेरी पोलिसांनी स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर नियमित सुरक्षा तपासणीचा हा भाग असल्याचे स्पष्ट केले आहे.
कुटुंबीयांची चौकशी केल्याचा दास यांचा आरोप
कॉक्रोच जनता पार्टीचे नेते सौरव दास यांनी बुधवारी रात्री त्यांच्या पद्दुचेरी येथील घरातील कुटुंबीयांची पोलिसांनी चौकशी केल्याचा आरोप केला. व्हाईट टाऊन भागातील त्यांच्या कौटुंबिक घरी पोलीस अधिकाऱ्यांनी जाऊन कुटुंबीयांची चौकशी केली. राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भीती घालण्याचा आणि दबाव निर्माण करण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप दास त्यांनी केला आहे. पोलिसांकडून त्यांच्या नेमक्या कोणत्या कौटुंबिक सदस्यांची चौकशी करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दास यांची पोस्ट
“दोन तासांपूर्वी पद्दुचेरी पोलिसांनी माझ्या घरी जाऊन कुटुंबायांची चौकशी केली. हे कोणाच्या सांगण्यावरून आणि कोणत्या उद्देशाने केले जात आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. केंद्र सरकारच्या सांगण्यावरूनच ही कारवाई झाल्याचा आरोप करत, “पद्दुचेरीतील भाजपा सरकार माझ्या कुटुंबावर दबाव का आणत आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सौरव दास यांचे आई-वडील या भागात राहतात, अशी माहिती समोर आली आहे.
दास यांनी स्पष्ट केली भूमिका
“मला शांत करण्याचा किंवा घाबरवण्याचा हा प्रयत्न असेल, तर तो यशस्वी होणार नाही. पण, यामुळे आमचा संकल्प अधिक दृढ झालाय. पोलीस हे गुंडांसारखे वागण्याऐवजी कायद्याचे रक्षण करतील, अशी एक उत्तम यंत्रणा उभारण्यासाठी आम्ही काम करत आहोत,” असे दास यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, पद्दुचेरी पोलिसांनी राजकीय दबावाचा आरोप फेटाळून लावला आहे. व्हाईट टाऊन परिसरातील सर्व घरे आणि आस्थापनांमध्ये नियमित बाब म्हणून भेट दिल्याचे स्पष्ट केले.
पोलिस काय म्हणाले?
या भागात नायब राज्यपालांचे निवासस्थान असून, गुरुवारी होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या संचलनाची पूर्वतयारी आणि सराव येथे नियोजित आहे, असेही पोलिसांनी स्पष्ट केले. संचलनाच्या पार्श्वभूमीवर व्हाईट टाऊन भागात सुरक्षेची नियमित तपासणी सुरू असल्याचे गुन्हे व गुप्तचर विभागाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी निथ्या राधाकृष्णन यांनी ’द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना सांगितले. ही पडताळणी प्रक्रियेचाच एक भाग असल्याचेही राधाकृष्णन यांनीही स्पष्ट केले.
