सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरील अत्यंत लोकप्रिय ठरलेले खाते ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) भारतात ब्लॉक करण्यात आले आहे. या कारवाईविरोधात या खात्याचे संस्थापक अभिजित दिपके यांनी थेट दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली असून, या याचिकेवर चालू आठवड्यातच सुनावणी होण्याची शक्यता आहे.

नेमकी कारवाई काय आहे?

‘द इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने (IB) या खात्यामुळे “राष्ट्रीय सुरक्षेला धोका” निर्माण होऊ शकतो, असा अहवाल दिला होता. या माहितीच्या आधारे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या कलम ६९ (A) अंतर्गत ‘X’ ला हे खाते भारतात प्रतिबंधित करण्याचे आदेश दिले. हे कलम सरकारला देशाचे सार्वभौमत्व, सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी माहितीवर बंदी घालण्याचा अधिकार देते. विशेष म्हणजे, हे खाते भारताबाहेरून अजूनही पाहिले जाऊ शकते.

वाद नेमका काय होता?

या संपूर्ण वादाची पाळेमुळे देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका विधानाशी जोडलेली आहेत. न्यायालयातील एका खटल्यादरम्यान सरन्यायाधीशांनी एका वकिलाला फटकारताना म्हटले होते, “समाजात आधीच काही परजीवी आहेत जे व्यवस्थेवर हल्ला करतात… काही तरुण कॉक्रोचसारखे (झुरळ) आहेत, ज्यांना कोणताही रोजगार नाही किंवा व्यवसायात स्थान नाही.”

या विधानानंतर सोशल मीडियावर मोठा गदारोळ झाला. नंतर सरन्यायाधीशांनी स्पष्टीकरण दिले की, “माझा रोख देशातील तरुणांवर नसून, बनावट पदव्या घेऊन वकिली किंवा पत्रकारितेत घुसलेल्या लोकांवर होता.”

‘CJP’ ची स्थापना आणि भीती

सरन्यायाधीशांच्या या विधानाचा निषेध म्हणून ३० वर्षीय अभिजित दिपके यांनी ‘X’ वर एक मोहीम सुरू केली. त्यांनी उपरोधाने सर्व ‘कॉक्रोज’ (तरुणांसाठी) एकत्र येण्याचे आवाहन करत ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची स्थापना केली आणि एक ऑनलाइन सदस्यत्व फॉर्म शेअर केला, जो प्रचंड व्हायरल झाला.

सध्या अमेरिकेतील बोस्टन येथे राहणाऱ्या अभिजित यांनी सांगितले की, “या कारवाईनंतर मला सातत्याने धमक्या येत आहेत. मी घेतलेल्या भूमिकेची किंमत भारतात राहणाऱ्या माझ्या कुटुंबाला चुकवावी लागू नये, याची मला काळजी वाटते आहे.”

पुढचे पाऊल काय?

अभिजित यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच झाल्याचा दावा करत कोर्टात याचिका दाखल केली आहे. आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा या लढाईत दिल्ली हायकोर्ट काय निर्णय देते, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.