Cockroach Janta Party Delhi High Court X account unblocking :कॉकरोच जनता पार्टीला मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने सीजीपीचे X खाते अनब्लॉक करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकारच्या वतीने न्यायालयात हजर झालेले सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हे खातं का ब्लॉक करण्यात आलं होतं याचं कारण स्पष्ट केल्यानंतर, न्यायमूर्ती स्वर्ण कांता शर्मा यांनी हा आदेश दिला. कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनीही यासंदर्भातील माहिती त्यांच्या एक्स खात्यावरून दिली.
मेहता यांनी न्यायालयात सांगितलं की, NEET फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता, कारण पक्षाच्या काही पोस्ट्समुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण होऊ शकलं असतं. मात्र, आता ही परीक्षा पार पडली असल्याने ही चिंता उरलेली नाही, असंही त्यांनी पुढे नमूद केलं. हे म्हणणं विचारात घेत न्यायमूर्ती शर्मा यांनी X खातं पूर्ववत करण्याचे आदेश दिले आणि सांगितलं की, “खातं ब्लॉक करण्यामागील मूळ कारण आता प्रासंगिक राहिलेलं नाही.”
सीजीपीचं X खातं का ब्लॉक करण्यात आलं होतं?
कॉकरोच जनता पार्टीची सुरुवात एक उपरोधात्मक संघटना म्हणून झाली होती. परंतु, नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये पसरलेल्या तीव्र असंतोषानंतर या संघटनेला तरुणांमध्ये मोठी लोकप्रियता मिळाली. सीजीपीला सोशल मीडियावर प्रचंड फॉलोअर्स मिळत असतानाच, मे महिन्यात त्यांचं X खातं भारतात ब्लॉक करण्यात आलं. एक्सच्या नियमांनुसार, जेव्हा एखाद्या अधिकृत संस्थेकडून वैध आणि योग्य विनंती प्राप्त होते, तेव्हा ठराविक देशात विशिष्ट मजकुराचा प्रवेश रोखणं आवश्यक असतं. यानंतर लगेचच सीजीपीने ‘कॉकरोच इज बॅक’ या नावाने नवीन खातं सुरू केलं. पक्ष अजूनही नियमित अपडेट्ससाठी याच खात्याचा वापर करत आहे.
विशेष म्हणजे, नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत सीजीपीने दिल्लीतील जंतरमंतरवर मोठी आंदोलने केली आहेत. दरम्यान, या मुद्द्यावर कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या बेमुदत उपोषणाचा आज मंगळवारी १० वा दिवस आहे. तसंच, दीपके यांनीही सोमवारी महाराष्ट्राचा दौरा केला आणि त्यांचे मूळ गाव असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये पेपरफुटीविरोधात आयोजित विद्यार्थी आंदोलनात भाग घेतला.
