कॉक्रोच जनता पार्टीला अमेरिका आणि पाकिस्तानमधून आर्थिक मदत मिळत असल्याचा गंभीर दावा केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी केला आहे. यावरून CJP आणि काँग्रेसने सत्ताधारी भाजपावर जोरदार टीका केली आहे. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी आरोप केला की, CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांना अमेरिकेतील देणगीदारांकडून, तर सह-संस्थापक आशुतोष रांका यांना पाकिस्तानमधील राजकीय नेत्यांकडून आर्थिक मदत मिळत आहे. या निधीचा वापर भारताविरोधी मोहिमा आणि सरकारविरोधात चुकीचे नरेटिव्ह तयार करण्यासाठी केला जात असल्याचे त्यांनी म्हटले. ‘इंडिया टूडे’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

“देशविरोधी शक्ती, परदेशी निधीवर चालणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि अराजकवादी घटक एकत्र येऊन देशात खोटी माहिती पसरवण्याचे काम करत आहेत. या अराजकवादी घटकांना अवैध मार्गाने निधी पुरवला जात असल्याचे सबळ पुरावे आहेत,” असा दावा सिंह यांनी केला. तसेच राजकीय आरोप करणाऱ्यांनी स्वतःच्या निधीचे स्रोत जाहीर करावेत, असे आव्हान देत त्यांनी परकीय नियमन कायद्याचे समर्थन केले.

CJP चे भाजपाला प्रत्युत्तर

केंद्रीय मंत्र्यांच्या या खळबळजनक आरोपानंतर CJP ने ‘X’वर पोस्ट करत जोरदार प्रत्युत्तर दिले.महत्वाच्या घटनात्मक पदांवर बसलेल्या व्यक्तींच्या विधानांच्या विश्वासाहर्तेवरच त्यांनी सवाल उपस्थित केला आहे. “ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. एक केंद्रीय मंत्री काहीही बोलून सहज सुटू शकतात. म्हणूनच आज उच्च पदांवर बसलेल्या व्यक्तींच्या शब्दांना काहीही मूल्य उरलेले नाही,” अशी टीका CJP ने केली आहे.

प्रियांक खर्गे यांचे अमित शाह आणि ‘रॉ’ला थेट आव्हान

या वादात आता काँग्रेसनेही उडी घेतली आहे. कर्नाटकाचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपाच्या आरोपांवर टीका केली. काँग्रेस किंवा इतर पक्षांना परदेशी निधी मिळत असल्याचा दावा केला जात असेल, तर त्याचा एक तरी पुरावा समोर आणावा, असे आव्हान त्यांनी दिले.

“गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि आपल्या गुप्तचर यंत्रणा (IB आणि RAW) काय करत आहेत? जर परदेशी निधीचा दावा करूनही सरकारकडे एक कागद किंवा पुरावा नसेल, तर ही या यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर मोठी प्रश्नचिन्ह आहे,” असा थेट हल्लाबोल खर्गे यांनी केला.

“राहुल गांधी अन् मोदींची समोरासमोर चर्चा व्हावी”

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेल्या खुल्या चर्चेच्या आव्हानाचा पुनरुच्चारही खर्गे यांनी केला. “काँग्रेस, भाजप किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणाला परदेशातून निधी मिळतो, यावर उघड्या मंचावर चर्चा व्हावी. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना दिलेले आव्हान स्वीकारावे. वाटल्यास या चर्चेचे मध्यस्थ म्हणून RSS प्रमुख मोहन भागवत यांना बसवावे,” असा टोलाही त्यांनी लगावला.

राहुल गांधी यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक पोल मोहीम राबवून तरुण वर्गाला ‘पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेत्यांमध्ये थेट चर्चा व्हावी का?’ असा प्रश्न विचारला होता. त्या पार्श्वभूमीवर खर्गे यांच्या या विधानामुळे राजकीय कलगीतुरारंग अधिकच तापला आहे.