Cockroach Janta Party : ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली आज (६ जून) दिल्लीत जंतर-मंतरवर आंदोलन करण्यात आलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी देशाचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या आंदोलनात देशभरातील हजारो विद्यार्थी आणि तरूणांनी सहभाग घेतला होता. या आंदोलनादरम्यान दिल्लीत मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात होता.

‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दिपके हे आज सकाळी अमेरिकेतून भारतात परतले आणि त्यानंतर त्यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथील आंदोलनाचं नेतृत्व केलं. ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या या आंदोलावर आता विविध क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या या आंदोलनावर अप्रत्यक्ष भाष्य करत टीका केली आहे. ‘परदेशात बसलेल्या काही लोकांना वाटतं की ते भारताच्या तरुणांना दिशा देऊ शकतात, पण देशातील तरुण हे परदेशात बसलेल्या लोकांच्या हातातील कठपुतले बनून पुढे जाणार नाहीत’, असं नितीन नबीन यांनी म्हटलं आहे.

नितीन नबीन काय म्हणाले?

“आजच्या तरुणाईला देशाच्या विकासासाठी काम करायचं आहे. आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी काम करायचं आहे. पण काही लोक तरुणांना सत्ताविरोधी (anti-establishment) ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत. जे लोक या देशातील तरुणांना नकारात्मक राजकारणाकडे नेऊ इच्छित आहेत. त्यांना मी इशारा देतो की, भारतातील तरुण सकारात्मक राजकारणात सहभागी होतील. आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू. पण लोकशाहीच्या मूल्यांची पायमल्ली होऊ देणार नाही”, असं नितीन नबीन यांनी म्हटलं आहे.

“देशातील तरुण गावात, कोचिंग संस्थांमध्ये आणि महाविद्यालयांच्या आवारात राहून आपली विचारशक्ती विकसित करतात. पण परदेशात बसलेल्या काही लोकांना वाटतं की ते भारतातील तरुणांना दिशा देतील. मात्र, भारतातील तरुण पिढी मूठभर लोकांच्या हातातील कठपुतले बनून पुढे जाणार नाही”, असं नितीन नबीन यांनी कोणाचंही नाव न घेता म्हटलं आहे.