Cockroach Janta Party split News: भारताचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या एका कथित टिप्पणीनंतर स्थापन झालेल्या कॉक्रोच जनता पार्टीला अल्पावधीतच मोठे यश मिळाले. नीट पेपरफुटीनंतर उभारलेल्या आंदोलनामुळे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला होता. भाजपाच्या सत्ता काळात जे विरोधी पक्षांना जमले नाही, ते सीजेपीने करून दाखवले. मात्र आता सीजेपीमध्ये बंडखोरी होऊन वेगळा गट स्थापन झाल्याची माहिती समोर आली आहे. स्वतःला सीजेपीचे सदस्य म्हणवणाऱ्या मनीष ब्रह्मभट यांनी ‘सीजेपी-डी’ या नावाने आता वेगळा गट स्थापन केला आहे.
मनीष ब्रह्मभट यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली आहे. वेगळा गट स्थापन करत असताना ब्रह्मभट यांनी अभिजीत दिपके यांच्यावर आरोप केला. दिपके यांनी आंदोलनातील तरुणांना बाजूला सारून काही निवडक लोकांची टीम तयार केली. ही खरेतर ‘केजरीवाल टीम’ आहे, अशी टीका ब्रह्मभट यांनी केली.
मनीष ब्रह्मभट यांनी आरोप केला की, पूर्वी आम आदमी पार्टीशी संबंधित असलेल्या लोकांचे वर्चस्व सीजेपीच्या नेतृत्वामध्ये आहे. त्यांना केवळ भाजपाला विरोध करण्यात रस आहे. ब्रह्मभट यांच्या आरोपावर अभिजीत दिपके यांनी हे वृत्त प्रसिद्ध होईपर्यंत प्रतिसाद दिलेला नव्हता.
मनीष ब्रह्मभट यापूर्वी ऑगस्ट महिन्यातही चर्चेत आले होते. दिल्लीच्या जंतर-मंतरवरील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे अभिजीत दिपकेंच्या निवासस्थानी सीजेपीच्या कोअर समितीची बैठक पार पडली होती. यावेळी दिपकेंच्या निवासस्थानाबाहेर मनीष ब्रह्मभट्ट आणि त्यांचे सहकारी राहुल पांड्या यांनी आंदोलन केले होते.
आपण सीजेपीचे सक्रिय सदस्य असूनही आपल्याला या बैठकीसाठी निमंत्रित केले नाही, असा आरोप ब्रह्मभट यांनी केला होता. आंदोलनादरम्यान दोघांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
‘सीजेपी-डी’ची स्थापना का?
आजच्या पत्रकार परिषदेत मनीष ब्रह्मभट म्हणाले की, आज आम्ही ‘कॉक्रोच जनता पार्टी – डेमोक्रॅटिक’ या संघटनेची सुरुवात करत आहोत. आम्हाला हा वेगळा गट स्थापन करण्याची गरज का भासली? कारण सीजेपीची चळवळ ही राष्ट्रासाठी सुरू झाली होती. तरूणांनी आपले रक्त आणि घाम सांडून चळवळ यशस्वी केली. मात्र यश मिळताच ही चळवळ राजकारण्यांचे बटीक झाली आहे.
वेगळा गट स्थापन करण्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखालील सीजेपीचा गट हा केजरीवाल टीमचा भाग आहे. त्या गटाचे सदस्य आम आदमी पक्षाशी संबंधित आहेत, असेही ते म्हणाले.
