Cockroach Janta Party Spokesperson Announcement Abhijeet Dipke: सोशल मीडियावर आपल्या उपरोधिक पोस्टमुळे अवघ्या एका महिन्यात तुफान चर्चेत आलेली ‘कॉक्रोच जनता पार्टी’ आता राजकीय आणि सामाजिक संघटनेचे रूप घेऊ लागली आहे. संघटनेचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी बुधवारी पक्षाच्या तीन मुख्य प्रवक्त्यांची घोषणा केली आहे. यामध्ये देशातील नामवंत शोधपत्रकार, चित्रपट निर्माते आणि आयआयटीच्या माजी विद्यार्थ्याचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांत या युवा ‘प्रेशर ग्रुप’ने सोशल मीडियाच्या पलीकडे जात प्रत्यक्ष आंदोलनाची तयारी सुरू केल्यामुळे राजकीय वर्तुळात या नव्या संघटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.
कोण आहेत कॉक्रोच जनता पार्टीचे नवे प्रवक्ते?
पक्षाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, देशातील आघाडीचे शोधपत्रकार सौरभ दास यांच्याकडे ‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या मुख्य प्रवक्तेपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तर राजकीय विश्लेषक व चित्रपट निर्मात्या विजेता दहिया आणि आयआयटी कानपूरचे माजी विद्यार्थी आशुतोष रांका यांची प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
- सौरभ दास (मुख्य प्रवक्ते): सौरभ दास यांना पत्रकारितेचा दांडगा अनुभव असून त्यांनी देशातील कायदेशीर, न्यायालयीन आणि सामाजिक मुद्द्यांवर महत्त्वपूर्ण शोधपत्रकारिता केली आहे. विशेष म्हणजे, नोव्हेंबर २०२५ मध्ये दिल्लीतील इंडिया गेट येथे झालेल्या प्रदुषणविरोधी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्यांमध्ये दास आघाडीवर होते.
- विजेता दहिया (प्रवक्ते): विजेता दहिया या राजकीय संशोधक, लेखका आणि चित्रपट निर्माते आहेत. दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या विजेता यांनी दोन बेस्ट सेलर पुस्तकेही लिहिली आहेत. राजकीय आणि रणनीतिक विश्लेषणात त्यांचा चांगला हातखंडा आहे.
- आशुतोष रांका (प्रवक्ते): आशुतोष रांका हे आयआयटी कानपूर आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी लंडनमध्ये ‘मॅककिन्से’ (McKinsey) या जागतिक कीर्तीच्या सल्लागार कंपनीत धोरणात्मक व्यवस्थापक म्हणून काम केले आहे. गेल्या वर्षी भारतात परतल्यानंतर त्यांनी जयपूरमध्ये ‘नीट (NEET) पेपर लीक’, ‘डोल का बाध’ आणि ‘अमायरा सुसाईड केस’ यांसारख्या शिक्षण, पर्यावरण आणि तरुणांच्या अनेक महत्त्वाच्या आंदोलनांचे नेतृत्व केले आहे.
जंतर-मंतरवरील आंदोलनापूर्वी संघटना मजबूत करण्यावर भर
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी या शनिवारी दिल्लीतील जंतर-मंतर येथे लाक्षणिक उपोषणाची घोषणा केली आहे. नुकताच देशातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
वांगचुक यांच्या पाठिंब्यानंतर अवघ्या एका दिवसात पक्षाने आपल्या प्रवक्त्यांची फौज जाहीर केल्यामुळे, ही संघटना आता सोशल मीडियावरील केवळ एक ‘ट्रेंड’ न राहता एक मजबूत आणि सुनियोजित संघटना म्हणून पुढे येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
