दिल्लीतल्या जंतरमंतर या ठिकाणी जून ते जुलै या कालावधीत विद्यार्थी आंदोलन पार पडलं. हे आंदोलन कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपकेंच्या नेतृत्वात पार पडलं होतं. नीट पेपरफुटीला विरोध दर्शवत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी या आंदोलनात करण्यात आली होती. २५ जुलैला धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला ज्यानंतर हे आंदोलन संपलं. या आंदोलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत अत्यंत हिणकस आणि अश्लाघ्य भाषांचा तसंच शिव्यांचा वापर झाला होता. ज्यानंतर खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतने या आंदोलकांना गटरछाप असं म्हटलं होतं. ज्यानंतर कंगनाला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. मात्र आता आपल्या या वक्तव्यावर तिने आता स्पष्टीकरण दिलं आहे.

कंगनाने काय स्पष्टीकरण दिलं?

अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतने म्हटलं आहे की होय मी जनरेशन गटर असा उल्लेख केला होता. पण मी ते सगळ्या युवकांना आणि तरुण तरुणींना उद्देशून बोलले नव्हते. जे स्वतःला कॉक्रोच म्हणवून घेत होते अशा सगळ्यांना उद्देशून मी ते विधान केलं होतं. जर कुणी स्वतःला झुरळ म्हणवून घेत असेल तर झुरळांची पैदास कुठे होते गटारातच. त्यामुळेच मी ते विधान केलं होतं असं कंगनाने म्हटलं आहे.स्वतःला कॉक्रोच म्हणवून घेणाऱ्यांना मी गटरछाप म्हटलं त्यात काय चूक आहे? आता त्यावरुन तुम्हाला दुःख होण्याचं कारण काय? जे स्वतःला कॉक्रोच म्हणवून घेत नाहीत त्यांना मी काहीच म्हटलेलं नाही. मी स्वतःला झुरळ मानत नाही. त्यामुळे मला कुणी असं बोललं तर मी म्हणेन की तुम्ही चुकीचं बोलत आहात. पण जे स्वतःला झुरळ म्हणवून घेत आहेत त्यांची पैदास गटारातलीच आहे. त्यांची मानसिकता तशी असेल. पण मी सगळ्या युवकांना, सगळ्या तरुणांना म्हटलं नाही. माझ्या ट्वीटमध्येही सम पिपल, सम विमेन असं म्हटलं आहे असं म्हणत कंगनाने स्पष्टीकरण दिलं आहे.

कंगना रणौतने नेमकं काय वक्तव्य केलं होतं?

“भारत हा विविधतेने नटलेल्या, सुंदर, शालीन आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगल्भ लोकांचा देश आहे. तुम्ही स्वतःला झुरळ म्हणवून घेता आणि तुमचं रूप व वर्तनही तसंच आहे. यात कोणताही विरोधाभास नाही, तर तुम्ही फक्त जगाला तुमची घाण आणि कुरुपपणा दाखवत आहात. मी हे रील्स पाहून हादरले आहे. मी त्यांना ‘जनरेशन गटर’ म्हणते. त्यांच्याकडे व्यवस्थेला देण्यासारखं काहीही नाही. त्या अभ्यासात चांगल्या नाहीत. त्या इतक्या कुरुप आणि भ्रष्ट आहेत की त्या गृहिणी देखील होऊ शकत नाहीत”