Atul Kulkarni Criticizes CJI Surya Kant for His Cockroach Remark: सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान देशातील काही बेरोजगार तरुणांना झुरळ म्हटले. हे बेरोजगार तरुण व्यवस्थेवर हल्ले चढवतात. काही जण माहिती अधिकार कार्यकर्ते बनतात, अशी टिप्पणी न्यायमूर्ती सूर्य कांत यांनी केली असून आता त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. सामाजिक, विधी आणि कला क्षेत्रातून लोक उघडपणे त्यांच्या विधानाचा निषेध करत आहेत. अभिनेते आणि सामाजिक-राजकीय भाष्यकार अतुल कुलकर्णी यांनी उपरोधिक शैलीत या विधानाचा समाचार घेतला.
सरन्यायाधीश सूर्य कांत नेमके काय म्हणाले?
तत्पूर्वी सरन्यायाधीश सूर्य कांत यांची टिप्पणी काय होती? हे पाहू. एका वकिलाने स्वतःच्या ज्येष्ठतेचा दावा करणारी याचिका दाखल केल्यानंतर सरन्यायाधीशांनी संताप व्यक्त केला. सदर वकील समाजमाध्यमांवर व्यक्त होत असल्याचा उल्लेख करत सरन्यायाधीशांनी पुढील टिप्पणी केली.
ते म्हणाले, “व्यवस्थेवर हल्ला करणारे परजीवी समाजात आधीच भरलेले आहेत. आता तुम्हीही त्यात सामील होणार का?… काही तरुण झुरळासारखे असतात, ज्यांना रोजगार मिळत नाही किंवा त्यांचे कोणतेही व्यावसायिक स्थान नसते. त्यातले काही माध्यमांत जातात, काही समाजमाध्यमांत जातात, काही जण माहिती अधिकार कार्यकर्ते किंवा अन्य कार्यकर्ते बनतात आणि सर्वांवर हल्ले करत सुटतात.”
अतुल कुलकर्णी काय म्हणाले?
अतुल कुलकर्णी यांनी मार्मिक शैलीत सरन्यायाधीशांच्या टिप्पणीवर उपरोधिक टोला लगावला. त्यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले, “झुरळांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे हे खरं आहे?
बऱ्याच वर्षांच्या राष्ट्रीय आणि पक्षीय धोरणांच्या अपयशामध्ये विनाकारण त्यांना खेचल्या बद्दल?”
अभिनेते अतुल कुलकर्णी हे नेहमीच व्यवस्थेतील कमतरतेवर बोट ठेवून आपले मत रोखठोकपणे व्यक्त करत असतात. नुकत्याच नीट पेपरफुटीप्रकरणातही त्यांनी केलेली पोस्ट व्यवस्थेचा कोडगेपणा दाखवून देणारी होती. त्यांनी एक्सवर काही प्रश्न देऊन त्याचे ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ असे पर्याय दिले होते.
ताजी अपडेट
अतुल कुलकर्णी यांनी याच विषयावर पुन्हा एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी उद्विगणता व्यक्त केली आहे.
होय, मी झुरळ आहे – अंजली दमानिया
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्यावर थेट टीका करत त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. त्यांनीही एक्सवर पोस्ट लिहून आपले मत व्यक्त केले. तसेच वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यावर सविस्तर भाष्य करत संताप व्यक्त केला.
अंजली दमानिया म्हणाल्या, “सरकारला प्रश्न विचारणे, पारदर्शकतेची मागणी करणे, हे जर चुकीचे असेल तर होय मी झुरळच आहे आणि झुरळच राहणार. मला त्याचा अभिमान आहे. हे कुठेतरी भलत्या दिशेने जाताना दिसत आहे. सरकारकडून आपण काहीच अपेक्षा करू शकत नाही. राजकारणी हवे तसे वागत आहेत. याला जर आपण प्रश्न विचारत असू आणि आपल्याला झुरळ म्हटले गेले तर प्रश्नचिन्ह निर्माण होते.”

“माननीय सरन्यायाधीश साहेब, होय मी ‘झुरळ’ आहे! मी एक भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्ती आहे आणि याचा मला अभिमान आहे. झुरळ कधीही मरत नाही, ते टिकून राहते, लढत राहते. पारदर्शकता आणि जबाबदारी मागणे हा ‘हल्ला’ नाही, तो आमचा संविधानिक अधिकार आहे. न्यायव्यवस्था जेव्हा नागरिकांना ‘कीटक’ म्हणते, तेव्हा प्रश्न विचारणे आणखी गरजेचे बनते”, अशी टीका दमानिया यांनी एक्स पोस्टद्वारे केली आहे.
असिम सरोदे यांचीही टीका
विधी आणि राजकीय विषयांवर भाष्य करणारे वकील असीम सरोदे यांनीही या प्रकरणात आपली भूमिका मांडली असून सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, ‘कॉकरोच’ आणि ‘परजीवी’ असे शब्द वापरून न्यायालयाने स्वतःची वैचारिक अवस्था दयनीय झाल्याचेच जाहीर करून टाकले.
एक्सवर लिहिलेल्या पोस्टमध्ये ते म्हणाले, “नवीन पिढीची अक्कल काढून बेरोजगार तरुणांचा अपमान केलाच आणि पत्रकार, आरटीआय कार्यकर्ते यांची तुलना झुरळांशी केल्याने झुरळांना नक्कीच आनंद झाला असेल. शेवटी एका वाक्यातील विचार मायलॉर्ड ने सिद्ध केला की, सर्वोच्च न्यायालय आणि सर्वोच्च शहाणपण या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत.”
सरन्यायाधीशांनी देशाची मोठ्या मनाने माफी मागावी. लोक माफ करतील, असेही वकील सरोदे यांनी म्हटले.
तुमचा मुलगा झुरळ आहे का? – हुसेन दलवाई
सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या विधानावर काँग्रेसचे नेते, माजी खासदार हुसेन दलवाई यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “तुमचा मुलगा झुरळ आहे का? ही कसली भाषा आहे? तुम्ही ज्या पदावर बसला आहात, त्या पदाची प्रतिष्ठा कमी करत आहात.”
Mumbai, Maharashtra: On CJI Surya Kant's remark on unemployed youth, Congress leader Hussain Dalwai says, "Is his son a cockroach? What kind of language is this? Whatever position you hold, speaking in this manner diminishes the dignity of that office. There is unemployment in… pic.twitter.com/Kk8b3XzyMz
— IANS (@ians_india) May 16, 2026
तरुणांना रोजगार नाहीत म्हणून काय ते झुरळ होतात का? असाही सवाल दलवाई यांनी उपस्थित केला. “तुम्ही कसे काय सरन्यायाधीश झालात? तुम्हाला ही संधी मिळाली म्हणून काय तुम्ही इतरांना झुरळ म्हणणार का? हा या देशातील तरुणांना अवमान आहे. त्यांनी तात्काळ माफी मागायला हवी अन्यथा त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे”, असेही दलवाई म्हणाले.
