सध्याच्या सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही व्हिडीओ अतिशय गंभीर असतात. आपल्या आसपास घडणाऱ्या घटनांचेच हे व्हिडीओ असतात. नेटकरी हे व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये अनेक व्हिडीओ हे अपघाताचेही असतात, तर काही व्हिडीओ अंगावर काटा आणणारे असतात.
आता अशाच एका घटनेचा अंगावर काटा आणणारा आणि एखाद्या ॲक्शन चित्रपटातील दृश्याप्रमाणे दिसणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एक पोलीस कर्मचारी कारच्या छतावर असताना एक कार तब्बल ४० किलोमीटरपर्यंत धावत राहिली. हा सर्व थरार गुटख्याची तस्करी करणाऱ्यांना पकडताना घडला आहे. अखेर गुटख्याची तस्करी करणाऱ्यांना तामिळनाडू पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी काय घडलं?
तमिळनाडूतील कोईम्बतूर या ठिकाणी गुटखा तस्करी करणाऱ्या संशयितांना पकडताना एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखा थरार पाहायला मिळाला. पोलिसांनी एका कारचा ४० किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. या पाठलागादरम्यान एक पोलीस कर्मचारी थेट धावत्या गाडीच्या छतावर चढला आणि ४० किलोमीटरपर्यंत तिथेच घट्ट पकडून राहिला.
गाडीच्या छतावर पोलीस कर्मचारी असतानाही आरोपी ती गाडी भरधाव वेगाने चालवत राहिले. मात्र, ४० किलोमीटरनंतर अखेर पोलिसांनी ती गाडी घेराव घालून थांबवली. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी तब्बल ३०० किलो गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले आहेत. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
झालं असं की, कोईम्बतूरमध्ये काही पोलीस कर्मचारी वाहनांची नियमित तपासणी करत होते. यावेळी पोलिसांनी एक आलिशान कार थांबवली. ती गाडी कर्नाटकातून आली असावी असा त्यांना संशय आला. कारच्या मागील भागात काही पोती आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी ते तपासण्याचा प्रयत्न केला असता कारमधील तिघांनी पोलीस कर्मचाऱ्यांना ढकललं आणि कारचे दरवाजे लॉक करून गाडी वेगाने पळवली.
या दरम्यानच हेड कॉन्स्टेबल वेलमुरुगन हे कारच्या छतावर चढले. त्यांना वाटलं की आरोपी कार थांबवतील. मात्र, आरोपींनी कार थांबवली नाही. कारच्या छतावर पोलीस पाहून उलट आरोपींनी ती कार वेगाने पळवली. त्यानंतर पोलिसांनी कानियूर पोलिसांची मदत घेतली. काही पोलिसांच्या गाड्या आणि रुग्णवाहिका त्या वाहनाचा पाठलाग करू लागल्या.
तब्बल ४० किलोमीटरचा पाठलाग केल्यानंतर अखेर ती कार अडवण्यात यश आलं. पोलीसांची वाहनं आणि रुग्णवाहिकांनी त्या कारला चारही बाजूंनी घेरलं असता आरोपींनी ती कार थांबवली. मात्र, कार थांबवल्यानंतर आरोपींपैकी दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. तर पोलिसांनी त्यातील एकाला ताब्यात घेतलं. त्यानंतर शोधमोहीम राबवून पोलिसांनी उर्वरित दोन आरोपींनाही पकडलं. अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी राजस्थानमधील असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
