पीटीआय, नवी दिल्ली
जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशात झालेल्या बर्फवृष्टी आणि पावसामुळे उत्तर भारतामध्ये थंडीची लाट आली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणाच्या किमान तापमानात चांगलीच घसरण झाली आहे. याबरोबरच बर्फ आणि धुके या नैसर्गिक अडथळ्यांमुळे विविध ठिकाणी महामार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाली. विशेषतः उंच प्रदेशांमध्ये प्रवासी आणि मालवाहतुकीला फटका बसला आहे.
जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात शनिवारीही अनेक ठिकाणी बर्फ साचून महत्त्वाचे रस्ते सलग दुसऱ्या बंद राहिले. हिमाचलसह हरियाणा आणि पंजाबमध्ये रविवारी आणि सोमवारीही काही काही ठिकाणी दाट ते अतिदाट धुके पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दिल्लीमध्येही रविवारी सकाळी विरळ ते मध्यम धुके पडण्याचा अंदाज आहे. दिल्लीमध्येही तापमानात मोठी घसरण झाली आहे. शुक्रवारी दिल्लीचे किमान तापमान १३.७ अंश सेल्सियस नोंदवले गेले होते, ते शनिवारी ७.६ अंश सेल्सियस इतके होते. त्यापूर्वी झालेल्या पावसामुळे दिल्लीच्या हवेची गुणवत्ताही सुधारून एक्यूआय १७६ इतका नोंदवला गेला.
दरम्यान, बारामुल्ला जिल्ह्यातील गुलमर्गमध्ये उणे १२ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. जम्मू-काश्मीरमधील हे सर्वात कमी तापमान होते. त्यापाठोपाठ गांदरबल जिल्ह्यातील सोनमर येथे उणे १०.५ आणि श्रीनगर येथे उणे १.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. तर अनेक ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांची लष्कराने सुटका केली.
