काश्मीर, लडाखमध्ये थंडीची लाट

थंडीच्या लाटेने काश्मीर खोरे आणि लडाख प्रदेशाला वेढायला सुरुवात केली असून, रात्रीचे तापमान गोठणबिंदूच्याही खाली जात आहे.

थंडीच्या लाटेने काश्मीर खोरे आणि लडाख प्रदेशाला वेढायला सुरुवात केली असून, रात्रीचे तापमान गोठणबिंदूच्याही खाली जात आहे. तर  कारगिल परिसरात या मोसमातील सर्वाधिक उणे १० तापमान अनुभवास येत आहे. जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये उणे १.२ अंश तापमान नोंदण्यात आले असून शनिवारी रात्री ते उणे १.१ इतके होते, अशी माहिती हवामान विभागाच्या प्रवक्त्याने दिली. शुक्रवारी रात्री श्रीनगर शहरात सर्वाधिक थंड तापमानाची नोंद झाली आहे. पर्यटनस्थळ आणि अमरनाथ यात्रेसाठीचा बेस कॅम्प म्हणून नावाजलेल्या पहलगाममध्ये उणे ४.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले.
४८ मच्छीमारांची हत्या
कानो, (नायजेरिया): नायजेरियातील बोरनो राज्यात बोको हरामच्या अतिरेक्यांनी मासे विक्री करणाऱ्या ४८ जणांना ठार केले. चॅड देशाच्या सीमेजवळ ही घटना घडल्याचे मासे व्यापारी संघटनेने सांगितले. नायजेरिया- चॅड दरम्यानचा रस्ता बोको हरामच्या अतिरेक्यांनी अडवला होता व गुरुवारी त्यांनी चॅडकडे जात असलेल्या ४८ मासे विक्रेत्यांना ठार केले, असे अबुबाकर गमांडी याने सांगितले.
कवटय़ा सापडल्या
पुरी: पुरी-कोणार्क रस्त्यावर कुसाभद्रा नदीवरच्या पुलाखाली वीस मानवी कवटय़ा  सापडल्या आहेत, असे पोलिसांनी सांगितले. तेथे म्हशींच्याही तीन कवटय़ा सापडल्या असून काही हाडे सापडली आहेत असे उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष मोहंती यांनी सांगितले. कवटय़ा काळ्या पडल्या असून त्या ठिकाणी पूजेचे साहित्यही सापडले आहे, ही काळी जादू किंवा मंत्रतंत्राचा प्रकार आहे किंवा काय याचा तपास सुरू आहे.
राज्यपालांना कार्यभार
कोलकाता: पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांना बिहारच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. बिहारचे सध्याचे राज्यपाल डॉ. डी.वाय. पाटील यांचा कार्यकाल पूर्ण झाला आहे. राष्ट्रपती भवनने तूर्त त्रिपाठी यांना बिहारच्या राज्यपालपदाची सूत्रे सोपवित असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
पोलीसच आरोपी
मुझफ्फरनगर :  मुझफ्फरनगर दंगल प्रकरणी विशेष चौकशी पथकाने तेरा जणांवर आरोपपत्र दाखल केले असून त्यात दिल्लीच्या एका पोलीस कॉन्स्टेबलचा समावेश आहे. विशेष पथकाचे निरीक्षक राम रतेन सिंग यांनी सांगितले की, कलम ३९५ , कलम ४३६, कलम १५३ए या कलमान्वये आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात दिल्ली पोलिसांचे कॉन्स्टेबल अनुजकुमार, राजेंदर काला, धर्मेदर , बिजेंदर रिशीदेवे, कृष्णन बिट्टू, लोकेंदर, निशू, ब्रह्मा, अमितकुमार , नरेंदर यांचा समावेश आहे.
मतदारसंघात गोळीबार
जम्मू:  जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक होत असून तेथे कथुआचे काँग्रेस उमेदवार बाबू सिंग यांच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार झाला. माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवास या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. यावेळी बाबू सिंग यांची पत्नी एकटीच घरात होती.
अरूणाचलला पुरस्कार
इटानगर- कौशल्य विकास व रोजगार निर्मिती क्षेत्रातील उत्कृष्ट प्रकल्पासाठी अरूणाचल प्रदेशला पुरस्कार मिळाला आहे. गुडगावच्या स्कॉच समूहाच्या वतीने सामाजिक आर्थिक मुद्दय़ांवर दिला जाणारा हा पुरस्कार शनिवारी सायंकाळी प्रदान करण्यात आला.
अफवेने मॉल बंद
कोइमतूर:  येथे सामाजिक संकतेस्थळांवरून आयोजित करण्यात आलेला किस ऑफ लव्ह कार्यक्रम होणार असल्याची अफवा पसरल्याने शॉपिंग मॉल बंद करण्यात आला. व्हॉटसअ‍ॅप  व सामाजिक संकेतस्थळांवरून ही अफवा पसरली होती. हिंदू मुन्नानी व इंदू मक्कल काटची या संघटनांनी चुंबन आंदोलन हाणून पाडण्याचा इशारा दिला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cold wave intensifies in kashmir kargil shivers