scorecardresearch

दगड, विटा अन् दांडक्याने बेदम मारहाण; कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून जीम ट्रेनरचा निर्घृण खून, कारण वाचून बसेल धक्का!

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एका २७ वर्षीय जीम ट्रेनरची निर्घृण हत्या केली आहे.

gym
संग्रहित फोटो- लोकसत्ता

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एका २७ वर्षीय जीम ट्रेनरची निर्घृण हत्या केली आहे. आरोपींनी दगड, विटा आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत जीम ट्रेनरचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहा विद्यार्थ्यांना अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

विराट मिश्रा असं मृत पावलेल्या २७ वर्षीय जीम ट्रेनरचं नाव आहे. याबाबत अधिक माहिती देताना साहिबाबादचे एसीपी भास्कर वर्मा यांनी सांगितलं की, मृत विराट मिश्रा हा लाजपत नगर येथील रहिवासी असून तो राज नगरमधील एका जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करायचा. घटनेच्या दिवशी मृत विराटने आपल्या घराजवळ मुख्य आरोपी मनीष याला एका तरुणीबरोबर आक्षेपार्ह अवस्थेत स्कूटरवर बसलेला पाहिलं. यानंतर विराट मिश्राने यावर आक्षेप घेतला आणि निवासी भागात असं कृत्य करू नका, असं सांगितलं. यावरून वाद वाढत गेला आणि वादाचं रुपांतर हाणामारीत झालं.

हेही वाचा- …अन् दोन सेकंदात होत्याचं नव्हतं झालं; दिल्लीत ५ मजली इमारत कोसळली, थरकाप उडवणारा VIDEO

विराटशी वाद झाल्यानंतर आरोपी मनीषने आपल्या कॉलेजच्या मित्रांना बोलावून घेतलं. संबंधित मित्रांच्या मदतीने मनीषने विराटवर विटा, दगड आणि काठीने हल्ला चढवला. यावेळी विराटच्या शेजारी राहणारा मित्र बंटी मदतीला धावून आला. पण आरोपींनी त्यालाही मारहाण केली. या मारामारीत दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दोघांनाही उपचारासाठी दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रविवारी बंटीला डिस्चार्ज देण्यात आला, तर विराट मिश्रा याचा सोमवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबतचं वृत्त ‘आज तक’ने दिलं आहे.

मृत विराटचा मित्र बंटीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एलआर महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला. मनीष कुमार सिंग (२०), गौरव कसाना (२२), विपुल कुमार (२२), मनीष यादव (२२), आकाश कुमार (२२) आणि पंकज असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी विद्यार्थ्यांची नावं आहेत. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-03-2023 at 21:37 IST
ताज्या बातम्या