Shocking case of college students kidnapping a classmate with a fake gun : पैशांची हाव आणि विलासी जीवन जगण्याच्या नादात तरुण पिढी गुन्हेगारीकडे वळत असल्याचे भयाण वास्तव एका घटनेतून समोर आले आहे. आपल्याच वर्गात शिकणाऱ्या मित्राचे अपहरण करून त्याच्या मित्रांकडे खंडणी मागण्याचा कट काही कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रचला. यासाठी त्यांनी चक्क बनावट बंदुकीचा वापर करून दहशत निर्माण केली.

ऐषोरामाचे आयुष्य जगण्यासाठी बंगळुरूतील जैन विद्यापीठाच्या चार विद्यार्थ्यांनी आपल्याच एका वर्गमित्राचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं.

हॉस्टेलच्या बाहेर बोलावले, बंदुकीचा धाक दाखवला

बिहार, झारखंड, केरळ आणि बंगळुरूचे असलेले हे चारही आरोपी विद्यार्थी जैन विद्यापीठात शिक्षण घेत आहेत. त्यांनी ओडिसाचा रहिवासी असलेल्या मोहंती नावाच्या विद्यार्थ्याचे अपहरण करण्याचा कट रचला. त्यांनी मोहंतीला हॉस्टेलच्या बाहेर बोलावले आणि बनावट बंदूक दाखवून जबरदस्तीने कारमध्ये बसवून एका आरोपीच्या खोलीवर नेले.

५० हजार रुपयांची मागणी

त्यानंतर आरोपींनी मोहंतीच्या मित्रांना फोन करून त्याच्या सुटकेसाठी ५० हजार रुपयांची मागणी केली. मित्रांनी सुरुवातीला १० हजार रुपये ट्रान्सफर केले, मात्र संशय आल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मोबाईल लोकेशन ट्रॅक करून आरोपींचा शोध घेतला आणि मोहंतीची सुटका केली.

पोलिसांनी या चारही आरोपींना अटक केली असून गुन्ह्यात वापरलेली बनावट धातूची बंदूक, चाकू आणि कार जप्त केली आहे. तपासादरम्यान असे समोर आले की, हे चारही आरोपी सराईत गुन्हेगार असून ते एका टोळीप्रमाणे काम करायचे आणि त्यांनी यापूर्वीही अनेक विद्यार्थ्यांना धमकावले होते.