Colombia Earthquake: सोमवारी सकाळी पश्चिम कोलंबियामध्ये झालेल्या शक्तिशाली भूकंपात किमान १३२ लोकांचा मृत्यू झाला असून, कोसळलेल्या इमारतींखाली बरेच लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गेल्या अनेक वर्षांतील देशातील सर्वात शक्तिशाली हा भूकंप आहे, असे येथील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच राष्ट्राध्यक्ष अबेलार्डो दे ला एस्प्रीएला यांनी या भूकंपानंतर राष्ट्रीय आपत्ती जाहीर केली आहे.

७.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंप

कोलंबियात सोमवारी ७.४ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंप झाला आहे. कोलंबियाच्या पॅसिफिक किनाऱ्यावरील चोको प्रांतातील सान जोस देल पाल्मार जवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता. कोलंबियाच्या भूवैज्ञानिक सेवेनुसार, हा भूकंप स्थानिक वेळेनुसार सकाळी ७:३४ वाजता १०३ किमी खोलीवर झाला. त्यानंतर २.८ आणि ४.८ रिश्टर स्केलचे दोन लहान धक्के बसले. या भूकंपाचे धक्के राजधानीसह प्रमुख शहरांमध्ये तसेच शेजारील इक्वाडोरमध्येही जाणवले.

अनेक इमारती कोसळल्या

शेजारील व्हेनेझुएलामध्ये याप्रमाणेच झालेल्या भीषण भूकंपात ६,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर ही दुर्घटना घडली आहे. नुकतेच पदभार स्वीकारलेले राष्ट्राध्यक्ष अबेलादो दे ला एस्प्रिएला यांच्यासमोर या नैसर्गिक आपत्तीच्या रूपाने पहिले मोठे संकट उभे ठाकले आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, रिसालदामध्ये सर्वाधिक मृत्यू झाल्याचे वृत्त असून, ४२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती गव्हर्नर हुआन दिएगो पातिणो यांनी दिली. परेरा येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून भागात अनेक इमारती कोसळल्या आहेत.

Colombia earthquake (AP Photo)
Colombia earthquake (AP Photo)

कलीमध्ये या भूकंपाने मोठ्या प्रमाणावर नुकसान

कोलंबियातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या कलीमध्ये या भूकंपाने मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. कलीचे महापौर अलेजांद्रो एडर यांनी २५ इमारती कोसळल्याची आणि नागरिक अद्याप ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती दिलीय. बचावकार्यात मदत करण्यासाठी पालिकेने बोगोटा आणि मेदेलिन येथून आपत्ती प्रतिसाद पथके मागवली आहेत.

महापौर काय म्हणाले?

“आतापर्यंत दोन जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे, ज्यात एक वृद्ध महिला आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. अजूनही काही लोक अडकले आहेत,” असे एडर यांनी ‘ब्ल्यू रेडिओ’ला सांगितले. शहरातील अनेक संवेदनशील ठिकाणी आपत्कालीन पथके कारवाई करत आहेत. चोको प्रांतातील सान जोस देल पाल्मारजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू होता.

बचाव आणि पाहणी पथकांचे काम सुरू

चोको प्रांतात जीवितहानी झाल्याचे आणि मोठे नुकसान झाल्याचे प्रशासनाने म्हटले आहे, भूकंप प्रभावित भागात बचाव आणि पाहणी पथकांचे काम सुरूच आहे. नागरिकांना भूकंपाचे धक्के पुन्हा बसण्याची शक्यता लक्षात घेऊन सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या दशकात देशात झालेला हा सर्वात शक्तिशाली भूकंप असल्याचे कोलंबियन जिऑलॉजिकल सर्व्हिसने म्हटले आहे.

इक्वाडोर आणि पनामामध्येही भूकंपाचे धक्के

शेजारील इक्वाडोर आणि पनामामध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. स्ट्रक्चरल नुकसानाच्या भीतीमुळे भूकंप प्रभावित भागांमधील अनेक विमानतळांवरील उड्डाणे स्थगित करण्यात आली आहेत. दरम्यान, कोलंबिया हा भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत सक्रिय पट्ट्यात वसलेला देश असून येथे विनाशकारी भूकंप, दरडी कोसळणे आणि इतर नैसर्गिक आपत्तींचा मोठा इतिहास आहे.