वृत्तसंस्था, बोगोटा : कोलंबियात सोमवारी पहाटे झालेल्या भूकंपामुळे अनेक शहरांतील इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. यामध्ये आतापर्यंत २५४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या भूकंपाची रिश्टर स्केलवर ७.४ एवढी तीव्रता नोंदवण्यात आली.

मंगळवारी दुसर्‍या दिवशीही भूकंपग्रस्त भागात इमारतींच्या ढिगार्‍याखालून लोकांना बाहेर काढण्याचे काम वेगाने सुरू होते. या भागात रुग्णालयासह अनेक इमारतींचे वरचे मजले कोसळले असून भिंतींना भेगा पडल्या आहेत. त्यामुळे परेरा, कॅली या शहरांत बेघर झालेल्या लोकांसह रुग्णांनाही रस्त्यांवरील खुल्या भागात आसरा घ्यावा लागला आहे.

कोलंबियामध्ये गेल्या अनेक दशकांमधील हा सर्वात संहारक भूकंप असल्याची नोंद करण्यात आली आहे. बचावपथकाचे सदस्य रात्रभर क्रेन, उत्खनन यंत्रांच्या सहाय्याने ढिगारे उपसण्याचे काम सुरू होते.राष्ट्राध्यक्ष ॲबेलार्डो डी ला एस्प्रिएला यांनी बचावकार्याचा आढावा घेतला. भूकंपाचा सर्वाधिक फटका बसलेल्या कॅली, परेरा या शहरांत रात्री संचारबंदीही लागू करण्यात आली.

बेपत्ता व्यक्तींचा शोध

भूकंपानंतर कोलंबियात तीन हजारांपेक्षा अधिक व्यक्ती बेपत्ता झाल्या आहेत. त्यांचा तपास सुरू असल्याचे कॅली, परेरो, चोको आणि मनिझालेझ येथील स्थानिक प्रशासनाने सांगितले. भूकंपामध्ये सुमारे १,६०० इमारती कोसळल्या आहेत किंवा त्यांचे नुकसान झाले आहे. ढिगार्‍याखाली अनेकजण अडकल्याची भीती आहे.