५०० सैनिक, २२ हेलिकॉप्टर अन्… ४३ कोटींचं इनाम असणाऱ्या ड्रग्ज तस्कराला फिल्मी स्टाइल अटक

कोलंबियामध्ये पाब्लो एस्कोबारनंतर सर्वात मोठ्या ड्रग्ज तस्कराला अटक करण्यात आली आहे.

Colombia most wanted drug lord dairo Antonio usuga otoniel captured
(फोटो सौजन्य : रॉयटर्स)

कोलंबियाच्या सशस्त्र दलांनी पाब्लो एस्कोबारच्या मृत्यूनंतर अंमली पदार्थांच्या तस्करीतील सर्वात मोठ्या आरोपीला अटक केली आहे. दाइरो आंतोनियो उसुगा उर्फ ओतोनिएल या ड्रग्ज तस्कराला कोलंबियामध्ये अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर ४३ कोटी रुपयांचे बक्षिस होते. वायव्य कोलंबियातील आंतिओक्विया राज्यातील एका खेड्यामध्ये त्याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती अध्यक्ष इव्हान ड्यूक यांनी दिली आहे.

५० वर्षीय ओतोनिएल, कोलंबियाच्या आंतिओक्विया प्रांतात असलेल्या उराबा प्रदेशातील ग्रामीण भागात ऑपरेशन ओसिरिस दरम्यान पकडला गेला. त्याच्यावर कोकेनची डझनभर शिपमेंट अमेरिकेमध्ये पाठवल्याचा आरोप आहे. तसेच त्याच्यावर इतर गुन्ह्यांसह पोलिस अधिकाऱ्यांची हत्या, अल्पवयीन मुलांची भरती आणि लैंगिक शोषणाचा आरोप आहे.

माहिती देणाऱ्यासाठी ४३ कोटी रुपयांचे बक्षीस

कोलंबियाने ओतोनिएलच्या ठावठिकाणाबद्दल माहिती देणाऱ्यासाठी तब्बल ४३ कोटी रुपयांपर्यंतचे बक्षीस ठेवले होते. तर अमेरिकेने त्याला शोधण्यात मदत करण्यासाठी पाच दशलक्ष डॉलरचे बक्षीस ठेवले होते. “या शतकातील अंमली पदार्थांच्या तस्करीविरूद्ध आपल्या देशाला मिळालेले हे सर्वात मोठे यश आहे. या यशाची १९९० च्या दशकात पाब्लो एस्कोबारच्या प्रकरणासोबत तुलना करता येईल,” असे ” ड्यूक यांनी म्हटले आहे. या कारवाईदरम्यान एका पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे, असेही ड्यूक यांनी सांगितले.

ओतोनिएल ड्रग्ज तस्करी करणाऱ्या किंवा गल्फ क्लानचा नेता बनला

ओतोनिएल हा डाव्या विचारसरणीचा गनिम म्हणून आणि नंतर निमलष्करी अधिकारी म्हणून ड्रग्ज तस्करी करणाऱ्या क्लॅन डेल गॉल्फो किंवा गल्फ क्लानचा नेता बनला होता. क्लॅन डेल गॉल्फोमध्ये सुमारे १,२०० सशस्त्र सैनिक आहेत. यातील बहुसंख्य अतिउजव्या निमलष्करी गटांचे माजी सदस्य आहेत. तसेच ते कोलंबियाच्या ३२ पैकी १० प्रांतांमध्ये कार्यरत आहेत. अंमली पदार्थांच्या तस्करीबरोबरच, क्लॅन डेल गॉल्फोवर बेकायदेशीर खाणकामात सामील आहेत. तसेच देशभरातील नेत्यांना धमकावण्याचा आणि ठार मारल्याचाही आरोपही त्यांच्यावर आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

‘ड्रग लॉर्ड’ होती म्हणून ओळख

कोलंबिया अनेक दशकांपासून अंमली पदार्थांच्या जाळ्यात अडकला आहे. इथे एक ड्रग्ज माफिया संपतो आणि दुसरा तयार होतो अशी परिस्थिती आहे. त्यानंतर आता कोलंबियाच्या सुरक्षा दलांनी देशातील मोस्ट वाँटेड ड्रग्ज तस्कर ओतोनिएल याला अटक केली आहे. त्याला ‘ड्रग लॉर्ड’ म्हणूनही ओळखले जाते.

अमेरिकेत कोविड काळात ९३,००० लोकांचा अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे मृत्यू

अमेरिकेने ओतोनिएल बद्दल माहिती देण्यासाठी पाच दशलक्ष किंवा सुमारे ३७ कोटी रुपयांचे बक्षीस ठेवले होते. २००९ मध्ये ओतोनिएलवर अमेरिकेत खटला दाखल करण्यात आला होता. त्याला आता न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टात हजर करण्यात येणार आहे. ड्रग्ज ही अमेरिकेसाठी एक मोठी समस्या आहे, ज्यामुळे दरवर्षी अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. जुलैमध्ये कोविड-१९ साथीच्या आजारामध्ये गेल्या वर्षी देशात विक्रमी ९३,००० लोक अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे मरण पावले होते असा निष्कर्ष अमेरिकेच्या सरकारने काढला आहे.

५०० सैनिक, २२ हेलिकॉप्टकरच्या मदतीने अटक

गल्फ क्लान म्हणून ओळखल्या जाणार्‍या ओतोनिएलने कोलंबियातील सर्वात मोठ्या ड्रग्ज तस्करी टोळीचे नेतृत्व केले होते. ओतोनिएलला पकडण्याच्या कारवाईत कोलंबियाच्या विशेष दलाचे ५०० हून अधिक सदस्य आणि २२ हेलिकॉप्टर सहभागी झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, गल्फ क्लानचे सुमारे ३०० नगरपालिकांपर्यंत साम्राज्य होते. गल्फ क्लानला २०१७ मध्ये कोलंबियाच्या न्याय प्रणाली अंतर्गत तडजोड करायची होती, पण सरकारने त्यांना ताब्यात घेण्यासाठी सुमारे एक हजार सैनिक तैनात केले होते. माध्यमांच्या अहवालानुसार त्यांनी गल्फ क्लानला पूर्णपणे उद्ध्वस्त केले होते. त्यामुळे ओतोनिएलला जंगलात आश्रय घेऊन लपावे लागले होते.

संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, ओतोनिएलने गल्फ क्लानच्या सहकार्याने दरवर्षी १८० टन ते २०० टन कोकेनची तस्करी केली. याशिवाय, त्याने आतापर्यंत कोलंबियाच्या सुरक्षा दलाच्या २०० हून अधिक सदस्यांना ठार केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Colombia most wanted drug lord dairo antonio usuga otoniel captured abn

ताज्या बातम्या