स्पॅनिश चित्रकार पाब्लो पिकासो कोणते रंग त्याच्या कॅनव्हासवर वापरत होता हे कोडे आता उलगडले असून, तो चक्क आपण घराला जो पेंट देतो तोच होता असा उलगडा आता झाला आहे. विसाव्या शतकातील एक प्रसिद्ध चित्रकार पाब्लो पिकासो याच्या कलेने अनेक सीमा ओलांडल्या होत्या. त्याची चित्रकला घनवाद म्हणजे क्युबिझमवर आधारित होती. त्याने जे रंग वापरले होते तेही पारंपरिक संकेत मोडणारे होते, असे त्याच्या कलाकृतींचे एक्स-रे तंत्राने विश्लेषण केले असता दिसून आले आहे. कला विद्वानांना बऱ्याच काळापासून अशी शंका होती, की पिकासो हा घरातील पेंटच त्याच्या चित्रांसाठी वापरत असावा, तो बाकी चित्रकार वापरतात तसा रंग तो वापरत नसे, त्यामुळे त्याची चित्रे जास्त चमकदार (ग्लॉसी) दिसतात व त्यात ब्रशच्या कुठल्याही खुणा दिसत नाहीत. तो घरातील पेंटच वापरत होता याला आतापर्यंत कुठलेही पुरावे नव्हते, पण आता ते मिळाले आहेत.
लेमाँट येथील अरगॉन नॅशनल लॅबोरेटरीच्या वैज्ञानिकांनी त्यांची हार्ड एक्स-रे नॅनोप्रोब ही पद्धत पिकासोच्या चित्रांसाठी वापरली. पिकासोने १९३१मध्ये द रेड आर्मचेअर नावाचे चित्र काढले होते ते आर्ट इन्स्टिटय़ूट ऑफ शिकागो या संस्थेतून पिकासोचे हे चित्र आणले व त्याचे संशोधन केले. नॅनोप्रोब या उपकरणाने या चित्रातील रंगकणही दिसले आहेत, त्यामुळे तो रंग रासायनिक होता हे स्पष्ट झाले आहे. विश्लेषणाअंती असे दिसून आले, की पिकासो हा रिपोलिन या प्रसिद्ध हाऊस पेंट ब्रँडच्या रंगासारखेच मिश्रण वापरत होता. संशोधकांनी त्याच्या चित्रातील रंगद्रव्यांची तुलना त्या काळातील पेंट म्हणजे घराला दिल्या जाणाऱ्या रंगांशी करून पाहिली आहे.