Comedian dressed as Donald trump sells h1b visas in india video goes viral : अमेरिकेचे इमिग्रेशन पॉलिसी गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. या दरम्यान एका कॉमेडियनने अमेरिकेच्या स्थलांतर धोरणावर व्यंगात्मक टीका केल्याचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये हा कॉमेडियन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नक्कल करताना दिसून येत आहे. इतकेच नाही तर तो ट्रम्प प्रशासनाच्या स्थलांतराबाबतच्या धोरणाची खिल्ली उडवत, भारतामध्ये एच-१बी व्हिसा ‘बाय-वन-गेट-वन फ्री’ अशी ऑफर देत एच१बी व्हिसांची रस्त्यावर ‘विक्री’ करताना दिसत आहे. अमेरिकेच्या व्हिसा प्रोग्राममध्ये काही दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या बदलानंतर या व्हिडीओवर सोशल मीडिया वापरकर्ते भरभरून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

ट्रम्प यांच्याप्रमाणे वेषभूषा, हेअरस्टाईल केलेल्या कॉमेडियन ऑस्टिन नासो (Austine Nasso) यानs मंगळवारी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये तो लोकांकडे जाऊन आपण एक लाख रूपयांना एच-१बी व्हिसा विकत असल्याचे सांगताना दिसत आहे. “आम्ही एच१बी व्हिसा विकत आहोत. एक विकत घ्या आणि एक मोफत मिळवा,” अशी ऑफर तो रस्त्यावरील लोकांना देताना दिसत आहे.

एका व्यक्तीला जेव्हा तो ही ऑफर ऐकवतो, तेव्हा तो व्यक्ती मी अमेरिकेपेक्षा युरोपात जाणे पसंत करेल असे म्हणतो. यावर नासो ‘हे खूपच वाईट आहे’, अशी प्रतिक्रिया देताना दिसतो आहे. नंतर तो दुसर्‍या एक व्यक्तीला तो विचारतो की, “एक लाख अमेरिकन डॉलर्समध्ये एच१बी घेणार का?” यावर तो व्यक्त प्रतिक्रिया देतो की, “माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत.” यावर नासो त्यांना उपहास करत विचारतो की, “तुम्ही २ लाख डॉलर्स देऊ शकता का?” आणि त्या व्यक्तीशी ‘डील’ असं म्हणत हस्तांदोलन करतो. ‘हा व्यक्ती अमेरिकेत येत आहे. आपण त्याला Guantanamo Bay येथे पाठवणार आहोत,’ असेही नासो कॅमेऱ्याकडे पाहत खोचकपणे म्हणताना दिसत आहे.

या व्हिडीओबाबत सोशल मीडियावर भरपूर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. एका वापरकर्त्याने कमेंट केली की, “बाय १ गेट १ फ्री आणि कोणत्याही भारतीय व्यक्तीने ही ऑफर स्वीकारली नाही? माझा देश बदलत आहे.”

एच१बी व्हिसा स्पॉन्सरिंग करणाऱ्या कंपन्यांसाठी १ लाख अमेरिकन डॉलर्सची फी लागू करण्याचा निर्णय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केल्यानंतर, या निर्णयाची खिल्ली उडवणारा हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानंतर आधीच्या तुलनेत ही फी प्रचंड वाढली आहे. आधी कंपन्यांना परदेशी कामगारांना रजिस्टर आणि पेटिशन्स फाईल करण्यासाठी अवघे काही हजार डॉलर्स द्यावे लागायचे, आता ही फी मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे.

फी वाढवल्याने फक्त खऱ्या अर्थाने अत्यंत कुशल कामगारच अमेरिकेत दाखल होतील असे व्हाईट हाऊसने त्यांच्या निर्णयाचे समर्थन करताना म्हटले होते. यावेळी अधिकार्‍यांनी युक्तीवाद केला की, एच-१बी प्रोग्रामचा यापूर्वी गैरवापर होत आला आहे आणि या बदलामुळे कंपन्यांना अमेरिकन कर्मचार्‍यांना प्राधान्य देण्यास प्रोत्साहन मिळेल. मात्र या फी वाढीच्या घोषणेमुळे भारतीय कर्मचार्‍यांची चिंता, विशेषतः टेक्नॉलॉजी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचार्‍यांची चिंता चांगलीच वाढल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान धोरणावरून गोंधळाची स्थिती निर्माण झाल्यानंतर व्हाईट हाऊसने स्पष्ट केले की १ लाख डॉलर्सची फी ही फक्त एकवेळ भरावी लागेल आणि ती फक्त नव्या व्हिसा अर्जांसाठीच असेल. तुम्ही व्हिसा रिन्यू करत असाल किंवा आधीच एच१बी व्हिसा असलेल्यांसाठी ही फी नसेल.