Commercial LPG Cylinder Price Hike : मुंबईत सीएनजीच्या दरांत एक रुपयांनी वाढ झाल्यानंतर आता १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरातही १० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता तुमच्या हॉटेलच्या बिलात वाढ होण्याची शक्यता आहे. या वाढीमुळे व्यावसायिक सिलिंडरची किंमत २ हजार ८२० रुपये झाली आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

सरकारी तेल कंपन्यांच्या माहितीनुसार, ही दरवाढ १ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. या सुधारित दरांमुळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्ससाठी स्वयंपाकाच्या इंधनाचा खर्च वाढणार आहे. दरम्यान, घरगुती एलपीजी सिलिंडरचे भाव मात्र स्थिर म्हणजेच कायम आहेत.

जागतिक ऊर्जा पुरवठ्यातील विस्कळीतपणा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेल्या दरांमुळे जून महिन्यात किमतींनी उच्चांक गाठला होता; जुलै आणि ऑगस्ट महिन्यात एलपीजी सिलिंडर दरात कपात करण्यात आली होती. फेब्रुवारी ते जून दरम्यान १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत १,३७३ रुपयांनी वाढून, १,७४०.५० रुपयांवरून थेट ३,११३.५० रुपयांवर पोहोचली होती. त्यामुळे जुलै आणि ऑगस्टमध्ये घट करण्यात आली.

घरगुती एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलचे दर कायम

सर्वसामान्य कुटुंबांना १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरसाठी ९४२ रुपये मोजावे लागणार असून, ताज्या सुधारणेमध्ये यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पश्चिम आशियातील संकटामुळे पुरवठा विस्कळीत झाल्याने आणि आंतरराष्ट्रीय ऊर्जेचा खर्च वाढल्यामुळे मार्च ते जून दरम्यान घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीत प्रति सिलिंडर ८९ रुपयांची वाढ झाली होती. तसेच, पेट्रोल आणि डिझेलचे दरही स्थिर आहेत. मे महिन्यात दोन्ही इंधनांच्या दरात प्रति लीटर सुमारे ७.५० रुपयांची शेवटची वाढ करण्यात आली होती.

विमान इंधनाच्या किमतीत सलग चौथ्या महिन्यात वाढ

व्यावसायिक एलपीजी दरांच्या सुधारसोबतच विमान इंधनाच्या किमतीत प्रति लीटर १.३७ रुपयांची वाढ झाली आहे. पीटीआयच्या माहितीनुसार, नवीन सुधारित दर आता पूर्वीच्या १३७.१२ रुपयांवरून १३८.५० रुपये प्रति लीटर झाले आहेत. विमान इंधनाच्या किमतीत सलग चौथ्या महिन्यात झालेली ही वाढ आहे. यापूर्वी १ ऑगस्ट रोजी ५ रुपये, १ सप्टेंबर रोजी ६.२८ रुपये आणि १ ऑक्टोबर रोजी १६ रुपयांनी प्रति लीटर दरात वाढ झाली होती.

विमान कंपन्यांच्या एकूण परिचालन खर्चात विमान इंधनाचा वाटा तब्बल ४० टक्क्यांपर्यंत असतो, यामुळे या ताज्या दरवाढीमुळे विमान कंपन्यांच्या खर्चात आणखी भर पडणार आहे. आंतरराष्ट्रीय बेंचमार्क आणि रुपया-डॉलरच्या विनिमय दरातील बदल लक्षात घेऊन दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एटीएफ आणि एलपीजीच्या किमती सुधारित केल्या जातात. स्थानिक कर आणि व्हॅटमुळे हे दर वेगवेगळ्या राज्यांमध्ये भिन्न असू शकतात.