पीटीआय, नवी दिल्ली
देशातील पाच विधानसभा निवडणुका समाप्त झाल्यावर शुक्रवारी सिलिंडर दरवाढीचा मोठा भडका उडाला. केंद्र सरकारने व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ९९३ रुपयांची, तर पाच किलो वजनाच्या सिलिंडरच्या दरात २६१.५० रुपयांची वाढ केली. ही सर्वात मोठी दरवाढ आहे. या दरवाढीने हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळींसह औद्योगिक क्षेत्राला फटका बसेल. कामगार वर्गालाही याची मोठी झळ बसणार आहे. दरम्यान, नजीकच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याचे संकेत मिळत आहेत.
पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमतीत ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्यामुळे इंधन पुरवठा साखळीवर मोठा ताण पडला असून, वाढलेल्या किमतींचा बोजा टप्प्याटप्प्याने ग्राहकांवर टाकण्याचे धोरण अवलंबले जात आहे. याच पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांकडून ही दरवाढ जाहीर करण्यात आली आहे.
तीन हजार रुपयांना सिलिंडर
व्यावसायिक वापरासाठीचा १९ किलो वजनाचा सिलिंडर आणि ५ किलोच्या सिलिंडरच्या दरात आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरात फेब्रुवारीपासून १,३८० रुपयांची वाढ झाली आहे. या सिलिंडरच्या दरात ९९३ रुपयांची वाढ केल्याने तो ३,०७१.५० रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. तसेच, ५ किलोच्या सिलिंडरचा दर ५४९ वरून थेट ८१०.५० रुपयांपर्यंत गेला आहे. पेट्रोल, डिझेल आणि १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. देशातील ८० टक्के इंधन वापर याच क्षेत्रांत होतो, त्यामुळे सामान्य जनतेला याचा फटका बसलेला नाही असे ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन’ने स्पष्ट केले. तेल कंपन्यांनी देशांतर्गत विमानासाठीच्या इंधन दर (एटीएफ) स्थिर ठेवले आहेत. यामुळे स्थानिक विमान कंपन्यांना दिलासा मिळाला असून संभाव्य भाडेवाढ टळली आहे.
आंतरराष्ट्रीय सेवांना फटका
आंतरराष्ट्रीय सेवांसाठी विमान इंधनाचे दर महिनाभरापूर्वी दुप्पट झाले होते. यानंतर आता सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांसाठी ‘एटीएफ’च्या दरात ७६.५५ अमेरिकन डॉलर्स प्रति किलोलिटर (किंवा ५.३३ टक्के) वाढ केली आहे. यामुळे आता हा दर १,५११.८६ डॉलर्स प्रति किलोलिटर झाला आहे. शिवाय, टेलिकॉम टॉवर्ससारख्या औद्योगिक वापरासाठी लागणार्या ‘बल्क डिझेल’च्या दरातही वाढ करण्यात आली आहे. हे दर प्रतिलिटर १३७ रुपयांवरून १४९ रुपयांच्या पुढे गेले आहेत.
इंधन दरवाढीचीच्या भडक्याची चिन्हे
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ होत असताना, किरकोळ दरांमध्ये गेल्या चार वर्षांपासून कोणतीही वाढ झालेली नाही. त्यामुळे नजीकच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याचे संकेत मिळत आहेत. विधानसभा निवडणुकांसाठीचे मतदान २९ एप्रिल रोजी संपल्यानंतर इंधनाच्या दरात प्रतिलिटर २५ ते २८ रुपयांची वाढ होण्याची शक्यता विश्लेषकांनी यापूर्वीच वर्तवली आहे.
या आठवड्यात आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाचे दर चार वर्षांतील उच्चांक गाठत १२६ अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर ते खाली आले असले तरी, ते ११० डॉलर प्रतिबॅरलच्या खाली आले नाहीत. आंतरराष्ट्रीय उर्जा खर्चात वाढ होत असताना, घरगुती सिलिंडर, पेट्रोल, डिझेलचे दर वाढवले जात नाही, असे ‘इंडियन ऑईल कॉर्पोरेशन’ने (आयओसी) निवेदन करताना सांगितले.
सरकारी मालकीच्या इंधन विक्रेत्यांना पेट्रोलवर प्रतिलिटर सुमारे २० रुपये आणि डिझेलवर साधारण १०० रुपये प्रतिलिटर तोटा सहन करावा लागत आहे. तरीही, किमती वाढवण्याची कोणतीही योजना सध्या नसल्याचे गेल्या आठवड्यात तेल मंत्रालयाच्या अधिकार्याने स्पष्ट केले होते.
तेल कंपन्यांची दरवाढ
इंधन ———-जुने दर (रु.)——-नवे दर (रु.)——-वाढ किती (रु.)
बल्क डिझेल (प्रति लिटर)——-१३७——१४९—-१२
५ किलो सिलिंडर—— ५४९——८१०.५०——२६१.५०
व्यावसायिक सिलिंडर (१९ किलो) —— २,०७८.५० ——- ३,०७१.५० ——९९३
आंतरराष्ट्रीय एटीएफ (प्रति किमी) ————— १,४३५.३१ (डॉलर) —— १,५११.८६ (डॉलर) —— ७६.५५ (डॉलर)
विद्यार्थी-नोकरदारांना अधिक फटका
छोट्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरवाढीने सामान्यांना मोठा फटका बसणार आहे. विशेषत: पाच किलो एलपीजी सिलिंडरचा दर ८१०.५० रुपये इतका केल्याने खानावळींना आर्थिक झळ बसेल. खाद्य पदार्थांचे दर वाढविल्याशिवाय पर्याय नाही. पर्यायाने याचा फटका विद्यार्थी आणि नोकरदारांना अधिक बसेल. जास्त दर वाढविल्यास व्यवसायावरही परिणाम होईल. त्यामुळेच ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांच्या संघटनांकडून होत आहे.
हॉटेलमधील खाद्यपदार्थांची दरवाढ अटळ
मुंबई : व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबाबत हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनने (वेस्टर्न इंडिया) संताप व्यक्त करत या निर्णयाचा व्यवसायावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली आहे. यामुळे खाद्य पदार्थांच्या दरांत १० ते १५ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये १९५.५० रुपये आणि मार्चमध्ये १४४ रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर एक महिन्याने पुन्हा ९९३ रुपयांची वाढ झाल्याने हॉटेल व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.
महागाईची झळ निवडणुकांनंतर बसेल असा इशारा यापूर्वीच दिला होता. हा एकप्रकारे निवडणुकीचा खर्चच आहे. दरवाढीचा परिणाम चहाचे स्टॉल, ढाबे, हॉटेल, बेकरी आणि मिठाईची दुकाने यांच्यावर होईल. पहिला घाव गॅसवर आणि पुढचा घाव पेट्रोल-डिझेलवर असेल. – राहुल गांधी, विरोधी पक्षनेते
