LPG Gas Price Hike : गेल्या एका महिन्यापासून सुरू असलेल्या अमेरिका आणि इराण युद्धाचा फटका सर्वसामान्य नागरिकांनाही बसताना दिसून येत आहे. आखाती देशांतील संघर्षामुळे जगातील अनेक देशांत ऊर्जा संकट ओढावण्याची शक्यता आहे. भारतातही याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असं असतानाच आता भारतातील व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत तब्बल १९५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात १९५.५ रुपयांची, तर कोलकातामध्ये २१८ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आजपासूनच (१ एप्रिल) हा बदल लागू करण्यात आला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

कोणत्या शहरांत गॅस सिलिंडर किती रुपयांनी महागला?

तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तेल कंपन्यांनी आजपासून (१ एप्रिल) १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केली असून दिल्ली आणि मुंबईत १९-किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात १९५.५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची नवीन किंमत दिल्लीत २,०७८.५० रुपये आणि मुंबईत २,०३१ रुपये असणार आहे.

तसेच कोलकातामध्ये व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात २१८ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार आता नवीन दर २,२०८.५० रुपये झाले आहेत. तसेच चेन्नईमध्ये २०३ रुपयांच्या वाढीनंतर १९-किलो एलपीजी सिलिंडरची किंमत आता २,२४६ रुपये झाली आहे.

दरम्यान, कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी भारतातील व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याच सांगितलं जात आहे. त्यामुळे या दरवाढीचा परिणाम हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिक क्षेत्रावर होण्याची शक्यता आहे.

घरगुती गॅसच्या किंमतीत कोणतीही वाढ नाही

भारतातील व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली असली तरी घरगुती गॅसच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. घरगुती गॅस सिलिंडरचे दर सध्या तरी स्थिर ठेवण्यात आल्यामुळे सर्वसामान्यांना तूर्तास मोठा दिलासा मिळाला आहे.