करोना काळामध्ये अनेक आरोप झालेल्या आणि अनेक जागतिक निर्बंधांचा सामना केलेल्या चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना अर्थात CPC उद्या म्हणजेच १ जून रोजी शंभरी पार करणार आहे. अर्थात जागतिक पटलावर चीनचंच नव्हे, तर कम्युनिस्ट विचारसरणीचं प्रस्थ निर्माण करणारा हा पक्ष गुरुवारी शंभर वर्षांचा होणार आहे. कम्युनिस्ट विचारसरणीने चालणारं प्रमुख राष्ट्र अशी ख्याती असणारा पक्ष असल्यामुळे आणि चीनमध्ये गेल्या अनेक दशकांमध्ये सत्तेत असल्यामुळे या पक्षाच्या शंभरीला महत्त्व आहेच. पण त्याचवेळी सध्याच्या परिस्थितीमध्ये करोनामुळे चीनची मोठ्या प्रमाणावर जागतिक मानहानी झाल्यामुळे या दिवशी कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भाषणाकडे साऱ्या चीनचंच नाही तर साऱ्या जगाचं लक्ष असणार आहे.

जागतिक पटलावर जिनपिंग काय संदेश देणार?

एरवी कम्युनिस्ट पार्टीचा वर्धापन दिन चीनमध्ये मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात साजरा झाला असता. मात्र, सध्याच्या परिस्थितीत या दिवशी मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम होणार नसल्याचं पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र, अध्यक्ष शी जिनपिंग यांचं अभिभाषण मात्र होणार असून त्यामधून जागतिक पटलावर चीन महासत्तांना आणि शेजारी देशांनाही इशारा देण्याची शक्यता आहे. करोनाच्या विषाणूचा जन्म चीनमध्ये झाला की चीननेच प्रयोगशाळांमधून त्याला जन्म घातलाय, याविषयी अजूनही निश्चित असं उत्तर मिळालेलं नसलं, तरी या मुद्द्यावरून चीनविषयी मोठ्या प्रमाणात जागतिक पटलावर असंतोष पसरला. त्यामुळे उद्याच्या भाषणात शी जिनपिंग चीनसोबतच जगालाही काय संदेश देणार, हे महत्त्वाचं ठरणार आहे.

‘शीतयुद्धा’चा ताप परवडणारा नाही!

रशियाशी मैत्री आणि वैर

१९२१ मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना अर्थात चायनिज कम्युनिस्ट पार्टी (CPC) ची स्थापना झाली होती. रशियामधील सोव्हिएत कम्युनिस्ट पार्टीच्या सहकार्याने चीनमध्ये या पक्षाची स्थापना झाली. सुरुवातीच्या काळात सीपीसी आणि रशियन कम्युनिस्ट पक्षामध्ये मैत्री आणि सहकार्याचे संबंध होते. मात्र, या दोन्ही देशांमध्ये विचारसरणीमुळे दुरावा आल्यानंतर सीपीसीचा आंतरराष्ट्रीय समाजवादी चळवळींवर वरचष्मा राहिला. रशिया आणि चीन यांच्यातल्या दुराव्याचे परिणाम भारतातही दिसून आले. म्हणूनच इथे मार्क्सवादी विचारांना मानणारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (माकप)ची स्थापना झाली. माओवादी विचारांना मानणारा दुसरा गट नक्षलवादी चळवळीकडे आकर्षित झाला.

चीन विरुद्ध भारताचा आक्रमक पवित्रा; सीमेवर तैनात केले ५० हजार सैनिक

सीपीसीमध्ये अंतर्गत धुसफूस?

दरम्यान, सीपीसी शंभरी पार करत असताना पक्षामध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचं देखील बोललं जात आहे. पक्षाचे विद्यमान अध्यक्ष शी जिनपिंग यांनी ५ वर्षांच्या दोन टर्म पूर्ण झाल्यानंतर अध्यक्षांच्या राजकीय निवृत्तीबाबत घटनादुरुस्ती करून ते कलमच काढून टाकलं. त्यामुळे आता शी जिनपिंग अनिश्चित काळासाठी सीपीसीचे अध्यक्ष राहू शकतात. यामुळे पक्षांतर्गत नाराजी असल्याचं सांगितलं जात आहे.