पत्नीची दुसऱ्या स्त्रीशी तुलना करणे हे मानसिक क्रौर्य!; केरळ उच्च न्यायालयाचे मत; सतत टोमणे मारणे आक्षेपार्ह

उच्च न्यायालयाने एका व्यक्तीच्या याचिकेवर हे मत व्यक्त केले. संबंधित व्यक्ती आणि महिला सुमारे १३ वर्षांपासून विभक्त राहात आहेत.

पत्नीची दुसऱ्या स्त्रीशी तुलना करणे हे मानसिक क्रौर्य!; केरळ उच्च न्यायालयाचे मत; सतत टोमणे मारणे आक्षेपार्ह
( संग्रहित छायचित्र )

पीटीआय, कोची : पत्नीची दुसऱ्या स्त्रियांशी सातत्याने तुलना करून, अपेक्षा पूर्ण करत नसल्याबद्दल पतीने तिला सदैव टोमणे मारत राहणे मानसिक क्रौर्य असून, संबंधित महिलेने हे सर्व निमूटपणे सहन करावे, अशी अपेक्षा करणे चुकीचे असल्याचे मत केरळ उच्च न्यायालयाने व्यक्त केले.

उच्च न्यायालयाने एका व्यक्तीच्या याचिकेवर हे मत व्यक्त केले. संबंधित व्यक्ती आणि महिला सुमारे १३ वर्षांपासून विभक्त राहात आहेत. एका कौटुंबिक न्यायालयाने त्यांच्या घटस्फोटाचा निर्णय दिला होता. संबंधित व्यक्तीने या निर्णयास आव्हान देताना ही याचिका दाखल केली होती. कौटुंबिक न्यायालयाने या दोघांमध्ये वैवाहिक संबंध नसल्याच्या आधारे त्यांच्या घटस्फोटाचे आदेश दिले होते. मात्र उच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या तपशिलात जाऊन घटस्फोटाच्या १८६९ अधिनियमांतर्गत पतीने मानसिक क्रौर्यातून दिलेल्या वागणुकीमुळे हा घटस्फोट कायम ठेवण्याचा निर्णय दिला. त्या वेळी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नमूद केले, की प्रतिवादी (पती) पत्नीची इतर स्त्रियांशी तुलना करून, ती त्याच्या अपेक्षेनुसार नसल्याने तिला सतत टोमणे मारत होता. अपमान करत होता. हे निश्चितपणे मानसिक क्रौर्य असून, संबंधित स्त्रीने ते निमूटपणे सहन करत राहण्याची अपेक्षा चुकीची आहे. यासाठी उच्च न्यायालयाने विविध साक्षीदार, पत्नी आणि तिच्या आईची साक्ष व पतीने या महिलेस वेळोवेळी पाठवलेल्या ई-मेलच्या तपशिलांच्या आधारे हा निर्णय दिला. त्यांचा विवाह जानेवारी २००९ला झाला होता. ते फार अल्प काळ एकत्र राहिले. नोव्हेंबर २००९ मध्ये घटस्फोटासाठी त्यांनी याचिका दाखल केली होती. न्यायालयासमोर आणण्यात आलेल्या पुराव्यांनुसार हे पती-पत्नी फार तर महिनाभर एकत्र राहत होते. त्यांचा विवाह नावापुरताच झाला होता. 

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
बिहारच्या नव्या मंत्रिमंडळात ७२ टक्के मंत्री कलंकित; ५३ टक्के मंत्र्यांविरुद्ध गंभीर गुन्हे, ८४ टक्के मंत्री कोटय़धीश
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी