पुढील आठवड्यात औषध महानियंत्रकांना अहवाल

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लशीच्या मुलांवरील दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. अठरा वर्षांखालील मुलांवर या चाचण्या घेण्यात आल्या असून त्याची माहिती पुढील आठवड्यात भारताच्या महाऔषध नियंत्रकांना सादर करण्यात येणार आहे, असे भारत बायोटेक इंटरनॅशनल लि. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा इल्ला यांनी सांगितले. ते म्हणाले की,  कोव्हॅक्सिन लशीचे उत्पादन ऑक्टोबरपर्यंत ५.५ कोटी मात्रांपर्यंत जाईल, सप्टेंबरमध्ये ते ३.५ कोटी मात्रा इतके होते. नाकावाटे देण्याच्या कोविड प्रतिबंधक लशीच्या चाचण्या  पुढील महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे. मुलांसाठीच्या कोव्हॅक्सिन लशीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्या असून आता माहितीचे विश्लेषण व संकलन करून पुढील आठवड्यात ती माहिती महाऔषध नियंत्रकांना सादर करण्यात येणार आहे. चाचण्या करण्यात आलेल्या मुलांची संख्या एक हजाराच्या आसपास आहे. त्यापुढच्या टप्प्यात नाकावाटे देण्याच्या लशीच्या चाचण्या केल्या जात असून या लशीमुळे नाकातच करोनाच्या विषाणूला प्रतिकारशक्ती प्रणालीच्या मदतीने प्रतिकार केला जाईल. त्यातून करोनाचा संसर्ग, प्रसार यापासून संरक्षण मिळेल.

भारत बायोटेकने इंडियन इम्युनॉलॉजिकल्स आणि हेस्टर बायोसायन्सेस या कंपन्यांशी कोव्हॅक्सिन लशीच्या उत्पादनासाठी करार केला आहे. या  महिन्यात ३.५ कोटी लशींचे उत्पादन झाले, पुढील महिन्यात ५.५  कोटी लशींची निर्मिती होईल. बंगळुरू येथील प्रकल्पात वेगाने लस उत्पादन केले जात आहे.

नाकावाटे देण्याची लस

व्यवस्थापकीय संचालक इल्ला यांनी सांगितले की, नाकावाटे देण्याच्या कोव्हॅक्सिन लशीच्या चाचण्या सुरू करण्यात आल्या असून त्यासाठी तीन गट करण्यात आले. पण या चाचण्या संमिश्र स्वरूपाच्या असून त्यात एका गटाला कोव्हॅक्सिन लशीची पहिली मात्रा देण्यात आली, तर दुसरी मात्रा नाकावाटे देण्याच्या लशीची होती. दुसऱ्या गटात नाकावाटे देण्याच्या लशीची चाचणी करण्यात आली. दोन्ही वेळा लस नाकावाटेच देण्यात आली. दोन्ही लशीतील अंतर २८ दिवसांचे होते.  यात एकूण ६५० जणांचा सहभाग होता.

इतर उत्पादकांनी सुरक्षा व इतर घटक योग्य प्रकारे पार पाडले तर, लशीच्या महिन्याला १० कोटी लस मात्रा तयार करणे शक्य आहे.