२००४ मध्ये अमेठी लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी पहिल्यांदा खासदार झाले. तेव्हापासून त्यांचे वास्तव्य तुघलक रोडवरील सरकारी निवासस्थानी राहिले आहे. सलग चार लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मला निवडून दिल्यामुळे खासदार म्हणून मी इथे राहिलो. इथल्या अनेक सुखद आठवणींही आहेत. पत्रातील तपशिलांचे मी पालन करत आहे, असे राहुल गांधींनी लोकसभा सचिवालयाच्या उपसचिवांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. खासदारांचा कार्यकाळ संपला असेल वा तो बडतर्फ झाला असेल तर, त्याला महिन्याभरात सरकारी निवासस्थानाचा ताबा सोडावा लागतो.
हेही वाचा >>> आघाडीच्या एकजुटीसाठी काँग्रेसकडून ‘सावरकर’ मुद्दा बाजूला, सभांमधून भाजप-शिंदे गटाला प्रत्युत्तर
मी घर देईन- खरगे
राहुल गांधींना निवासाची कोणतीही अडचण येणार नाही. ते आईकडे (सोनिया गांधी यांच्या घरी) जाऊन राहू शकतात. नाही तर ते माझ्या घरी राहू शकतात. त्यांच्यासाठी मी माझे घर रिकामे करेन, असे काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.
लालकिल्ल्यावरून मशाल मोर्चा
काँग्रेसने मंगळवारी संध्याकाळी लालकिल्ल्यापासून मशाल मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या मोर्चाला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली नाही. काँग्रेसचे नेते हरीश रावत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
हेही वाचा >>>सावरकर मुद्दय़ावर पवारांची मध्यस्थी; भाजपविरोधातील एकजुटीसाठी सबुरीचा सल्ला, काँग्रेसचे नरमाईचे संकेत
देशव्यापी आंदोलन..
पक्षाच्या अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, अल्पसंख्याक विभागाच्या वतीने बुधवारी जिल्हा-जिल्ह्यात व १ एप्रिल रोजी राज्यांच्या राजधानीच्या शहरांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधींच्या पुतळय़ांसमोर निदर्शने केली जातील. याशिवाय, २९ मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत ब्लॉक आणि मंडल स्तरावर, १५ ते २० एप्रिलपर्यंत जिल्हा स्तरावर तसेच, २० ते ३० एप्रिल या कालावधीत राज्य स्तरावर ‘जय भारत सत्याग्रह’ केला जाणार आहे. सत्याग्रहामध्ये ‘मित्र पक्ष’ व आणि नागरी संघटनाही सहभागी होतील, अशी माहिती संघटना महासचिव के. सी वेणुगोपाल यांनी दिली.
निकालाच्या आव्हानात दिरंगाई नाही-रमेश
सुरत न्यायालयाच्या निकालाला वरिष्ठ न्यायालयात आव्हान देण्यात दिरंगाई झाल्याचे पक्षाचे माध्यम विभाग प्रमुख जयराम रमेश यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत फेटाळले. भाजपच्या नेत्यांकडून खोटय़ा बातम्या पसरवल्या जात आहेत. राहुल गांधींचा विधि चमू निकालाच्या आदेशपत्राचा अभ्यास करत असून लवकरात लवकर निकालाविरोधात आव्हान याचिका दाखल केली जाईल, असे रमेश यांनी सांगितले. पुढील तीन-चार दिवसांमध्ये सुरतच्या सत्र न्यायालयात निकालाला तसेच शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका केली जाणार असल्याचे समजते.