कोविड लशींचा संमिश्र वापरही फायद्याचा असल्याचे स्पेनमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनात दिसून आले आहे. अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस घेतलेल्यांना दुसरी मात्रा फायझरच्या लशीची जरी दिली तरी ती सुरक्षित व परिणामकारक आहे, असे प्राथमिक निष्कर्षात म्हटले आहे.

‘कॉम्बिव्हॅक्स’ अभ्यास स्पेनच्या कार्लोस ३ हेल्थ इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात आला असून त्यात असे दिसून आले, की अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लशीनंतर फायझरची लस दिली तरी आयजीजी प्रतिपिंड रक्तात ३० ते ४० पटींनी वाढतात. दोन्ही मात्रा अ‍ॅस्ट्राझेनेका या लशीच्या घेणाऱ्या रुग्णांपेक्षाही यात प्रतिपिंड जास्त वाढतात. पहिल्यांदा फायझरची व नंतर अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस घेतलेल्या व्यक्तीत प्रतिपिंडांचे प्रमाण सात पट वाढलेले दिसून आले. १८-५९ वयाच्या अ‍ॅस्ट्राझेनेकाची पहिली मात्रा घेतलेल्या ४५० व्यक्तींना फायझरची दुसरी मात्रा देण्यात आली. यात १.७ टक्के व्यक्तींमध्ये दुष्परिणाम दिसून आले. ते डोकेदुखी, स्नायूदुखी यासारखे होते, असे अभ्यासातील प्रमुख निरीक्षक डॉ. मॅग्डालेना कॅम्पिन्स यांनी म्हटले आहे. यातील कुठलेही परिणाम गंभीर स्वरूपाचे नव्हते.

ब्रिटनमध्ये संमिश्र लशींचा पहिला प्रयोग करण्यात आला होता, त्यात काही व्यक्तींना अ‍ॅस्ट्राझेनेका लशीनंतर फायझरची मात्रा देण्यात आली होती. त्यांच्यात मध्यम स्वरूपाची लक्षणे दिसली. त्यात डोकेदुखी, थंडी वाजून येणे असे प्रकार घडले. यात प्रतिकारशक्ती किती वाढली याचा अहवाल अजून आलेला नाही. अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस साठ वर्षे वयावरील व्यक्तींसाठी ठेवली तर काय होईल या विचारातून स्पेनने संमिश्र लस वापराचा अभ्यास केला आहे.

अ‍ॅस्ट्राझेनेकाची पहिली मात्रा घेतलेल्या तरुण व्यक्तींमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्याचे प्रकार झाल्याने त्यांनी या प्रकाराची धास्ती घेतली होती व आता दुसरी मात्रा अ‍ॅस्ट्राझेनेकाची घ्यायची नाही अशीच त्यांची भूमिका होती. त्यांना आता फायझरच्या लशीचा पर्याय उपलब्ध आहे, असे कार्लोस संस्थेचे वैद्यकीय संचालक जिझस अँतोनियो फ्रायस यांनी म्हटले आहे.