विद्यापीठात इस्लामी पेहरावाची सक्ती

अफगाणिस्तानात तालिबानची राजवट आल्यानंतर आता तेथे महिलांवर बंधने घालण्यात येत असून मुले व मुली यांच्यासाठी स्वतंत्र आसन व्यवस्था असणार आहे. इस्लामी पेहरावही त्यांना सक्तीचा करण्यात आला आहे. अफगाणिस्तानच्या उच्च शिक्षण मंत्र्यांनी ही माहिती दिली.

मंत्री अब्दुल बाकी हक्कानी यांनी पत्रकार परिषदेत नवे धोरण जाहीर करताना सांगितले, की यापुढे मुले व मुली यांना एकत्र बसून शिक्षण घेता येणार नाही. त्यांची वर्गवारी केली जाईल. दरम्यान त्यांच्या या वक्तव्याने  तालिबान १९९० मधील काळापेक्षा वेगळे वागेल अशी अटकळ होती, ती फोल ठरली आहे. त्या काळात तर महिलांना शिक्षण नाकारण्यात आले होते. त्यांना सार्वजनिक जीवनात स्वतंत्रपणे वावरता येत नव्हते.

तालिबानने आता म्हटले आहे, की आम्ही महिलांविषयीचा दृष्टिकोन बदलला आहे. पण तालिबानने अलिकडे महिलांविरोधात हिंसाचाराचा अवलंब केला होता. हक्कानी  यांनी सांगितले,की आम्ही वीस वर्षे मागे जाऊ इच्छित नाही त्यामुळे आज जी परिस्थिती आहे त्यावरूनच आम्ही पुढे पावले टाकू, पण विद्यापीठातील मुलींना काही निर्बंधांना सामोरे जावे लागणार असून त्यांच्यासाठी पोशाख ठरलेला असेल. हक्कानी यांनी म्हटले आहे, की हिजाब सक्तीचा असेल. संपूर्ण डोके झाकणारा कपडा की,आणखी काही हे अजून स्पष्ट करण्यात आलेले नाही. मुले व मुली  यांना एकत्र अभ्यास करता येणार नाही . सहशिक्षणाला आमचा विरोध आहे. विद्यापीठात जे विषय शिकवले जात आहेत त्यांचा आढावा घेतला जाईल. तालिबानने इस्लामचा कठोर अर्थ लावला असून त्यांनी कला व संगीतावर मागच्या राजवटीत बंदी घातली होती, पण आताही काही फार वेगळी परिस्थिती नाही.