करोना साथ, हवामान बदल, मानवी हक्कांची पायमल्ली यांसारख्या प्रश्नांवर सहकार्याने काम करण्याची गरज असून सध्या अनेक पेचप्रसंगांमुळे जग एका नवीन ऐतिहासिक वळणावर आहे, असे अमेरिकेच्या अध्यक्ष जो बायडेन यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेतील पहिल्या भाषणात मंगळवारी सांगितले. चीनबरोबर संघर्ष सुरू असताना अमेरिका आता नव्या शीतयुद्धाच्या काळात जाऊ इच्छित नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

अफगाणिस्तानातून सैन्य माघारीचे त्यांनी समर्थन केले आहे. भविष्यकाळ जे सर्वांना बरोबर घेऊन जातील व मुक्तपणे जगू देतील त्यांचा असणार आहे. जे मनगटशाहीने राज्य करू इच्छितात त्यांचा मात्र निश्चिातच असणार नाही, असा सूचक इशारा त्यांनी दिला. चीनचा थेट उल्लेख टाळून ते म्हणाले की, दोन देशात तणाव आहे पण आम्हाला त्यानिमित्ताने नवे शीतयुद्ध सुरू करण्याची इच्छा नाही.

अफगाणिस्तानातील सैन्य माघारीचे समर्थन करून त्यांनी सांगितले की, आम्ही अमेरिकी प्रशासनास संघर्षाच्या भूमिकेतून बाहेर काढून आता राजनैतिक प्रयत्नांवर जास्त भर देण्याचे ठरवले आहे. कारण जगात समस्यांची कमी नाही. आपल्या देशातील लोकांसाठी काम करतानाच उर्वरित जगातील लोकांसाठीही तेवढ्याच सक्षमपणे आम्ही काम करू, पण त्यात संघर्षाची कुठलीही  भूमिका असणार नाही. अफगाणिस्तानातील २० वर्षांचा संघर्ष आम्ही संपवला आहे, असे सांगून ते म्हणाले की, सतत युद्धाचा कालखंड आम्ही संपवला आहे. आता आम्ही राजनैतिक प्रयत्नांचा नवा अध्याय सुरू केला असून जगातील लोकांना विकासाच्या वाटेने नेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

बायडेन यांचे सोमवारीच न्यूयॉर्कमध्ये आगमन झाले आहे.  त्यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्र संघटना अजूनही काळास धरून आहे. ती कालबाह्य झालेली नाही. इतिहासाच्या महत्त्वाच्या वळणावर जग आहे.

‘लष्करी बळ हा अंतिम पर्याय’

बायडेन म्हणाले की, आजचे जग हे २००१ पेक्षा वेगळे आहे. अमेरिका आता पूर्वीचा देश राहिलेला नाही. प्रभावीपणे प्रतिकार करण्याची कला आम्हाला अवगत आहे. आम्ही मित्र देशांच्या मदतीने दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट करू. त्यासाठी लष्करी बळाचा वापर हा अंतिम पर्याय राहील.