काँग्रेस प्रणीत यूपीए सरकारने उर्जा क्षेत्राच्या व्यवस्थापनात गोंधळ घालून देशाला अंधारात ढकलल्याची टीका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी केली आहे.
ज्या प्रकल्पांची २०,००० मेगावॅट उर्जा निर्मितीची क्षमता आहे असे प्रकल्प यूपीए सरकारच्या नेतृत्वाखाली आता रसातळाला गेले असल्याचेही मोदी म्हणाले. ते भाग्वानपुरायेथील देशातील सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्पाच्या उदघाटनावेळी बोलत होते.
देशात कोळसा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असूनही देशातील उर्जा कंपन्यांना आज कोळशाची आयात करावी लागते. या सरकारने केवळ कोळशाबाबत घोटाळेच केले आहेत त्याचा दुसरा कोणताही उपयोग केला नाही असेही मोदी म्हणाले. उर्जा क्षेत्रातील काही धोरणांमध्ये बदल करणे गरजेचे आहे आणि भाजप सरकार सत्तेत आल्यावर उर्जा क्षेत्रातील प्रगतीवर आणि धोरणांवर भर देईल असा विश्वासही नरेंद्र मोदींनी यावेळी व्यक्त केला. मध्यप्रदेशातील भाजप सरकारने शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली उर्जा क्षेत्रात प्रगतीशील काम करून येत्या २०१५ पर्यंत २५,००० मेगावॅट इतकी अतिरिक्त उर्जा निर्मिती करण्यास यशस्वी होणार असल्याचे जाहीर केले आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात अंधारलेल्या देशाला तेजोमय प्रकाशाकडे घेऊन जाण्याची क्षमता भाजप राखते असेही मोदी यांनी म्हटले.