पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचं समोर येताच काँग्रेसने ह्या मुद्द्यावर आवाज उठवला आहे. पंतप्रधानांच्या अकाऊंटवरुन बिटकॉईन या चलनव्यवस्थेला समर्थन दर्शवणारं ट्वीटही करण्यात आलं होतं. यावरुन काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सोमवारी केंद्र सरकारकडे स्पष्टीकरण मागितलं आहे.

चौधरी यांनी लोकसभेत ह्या मुद्द्यावर चर्चा केली. ते म्हणाले, ज्या वेळी सरकार क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याचा विचार करत आहे, नेमकं त्याचवेळी पंतप्रधानांचं ट्विटर हँडल हॅक होतं आणि त्यावरुन सरकार क्रिप्टोकरन्सी स्विकारत असल्याच्या आशयाचं ट्वीट केलं जातं. त्यामुळे आता सरकारने हे संसदेत हे स्पष्ट करावं की क्रिप्टोकरन्सी स्विकारण्यात येणार आहे की नाही, नक्की हे प्रकरण काय आहे?

चौधरींचं म्हणणं आहे की, जर पंतप्रधानांचं ट्विटर खातं हॅक होऊ शकतं तर सरकार इतर नागरिकांच्या ट्विटर अकाऊंट्सच्या सुरक्षिततेबद्दल कशी खात्री देऊ शकेल? हा गंभीर मुद्दा आहे. देशाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. या आधीही त्यांचं अकाऊंट हॅक झालं होतं.
एका वर्षात दोन वेळा पंतप्रधानांचं ट्विटर अकाऊंट कसं काय हॅक होऊ शकतं याचं स्पष्टीकरण सरकारने द्यायलाच हवं, अशी मागणीही चौधरी यांनी केलं आहे.

पंतप्रधान मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक, बिटकॉईनला मान्यता दिल्याचं ट्वीट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विटर हँडल रविवारी काही वेळासाठी हॅक करण्यात आलं होतं. ट्विटर अकाऊंट काही वेळाने पुन्हा सुरळीत करण्यात आलं. मात्र अकाऊंट हॅक केल्यानंतर काही वेळातच हॅकर्सनी क्रिप्टोकरन्सीला प्रोत्साहन देणारं एक ट्वीट केलं होतं. नंतर हे ट्वीट डिलीट करण्यात आलं.अकाऊंट पुन्हा सुरक्षित करण्याआधी पंतप्रधान मोदींच्या ट्विटर अकाऊंटवरुन करण्यात आलेल्या ट्वीटमध्ये बिटकॉईनला मान्यता देण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. “भारताने बिटकॉईनला कायदेशीर मान्यता दिली आहे. भारताने ५०० बिटकॉईन खरेदी केली असून देशातील लोकांना वाटत आहे,” असं या ट्वीटमध्ये सांगण्यात आलं होतं.