नवी दिल्ली : लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीर रंजन चौधरी यांच्या राष्ट्रपतींसंदर्भात उच्चारलेल्या आक्षेपार्ह शब्दांमुळे गुरुवारी संसदेत रणकंदन झाले. सभागृहात अधीर रंजन यांच्याविरोधात अत्यंत आक्रमक झालेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि काँग्रेसच्या अध्यक्ष व खासदार सोनिया गांधी यांच्यामध्ये खडाजंगी झाली. त्यांच्यातील संतप्त शाब्दिक देवाण-घेवाणीमुळे निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य खासदारांना मध्यस्थी करावी लागली!

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल अधीर रंजन चौधरी यांनी ‘राष्ट्रपत्नी’ असा शब्दप्रयोग केला होता. त्याचे तीव्र पडसाद गुरुवारी लोकसभेचे कामकाज सुरू होताच पाहायला मिळाले. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह सत्ताधारी बाकांवरील भाजपच्या सदस्यांनी अधीर रंजन यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत सभागृहाची व राष्ट्रपतींच्या माफीची मागणी केली. लोकसभेत इराणी संतप्त होऊन अधीर रंजन तसेच, सोनिया गांधींवर शाब्दिक हल्लाबोल करत होत्या. काही मिनिटे सुरू असलेल्या भाजप सदस्यांच्या गदारोळानंतर लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

सभागृह तहकूब झाल्यानंतर सोनिया गांधी यांनी सत्ताधारी पक्षाच्या बाकांकडे जात भाजपच्या खासदार रमा देवी यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. ‘अधीर रंजन यांनी माफी मागितली आहे. मग, माझे नाव का घेतले जात आहे’, असा प्रश्न सोनियांनी रमादेवी यांना विचारला. भाजपच्या सदस्य सोनियांच्या माफीनाम्याच्या घोषण देत होते. सोनिया व रमा देवी यांच्यामध्ये बोलणे सुरू असताना स्मृती इराणी सोनियांजवळ गेल्या. ‘तुमचे नाव मी घेतले असून माझ्याशी बोला’, असे त्यांनी सोनियांना सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर, ‘मी तुमच्याशी बोलत नाही. तुम्ही माझ्याशी बोलू नका’, असे संतप्त प्रत्युत्तर सोनियांनी दिले. त्यामुळे इराणी यांनी रागाच्या भरात सोनियांना ‘तुम्ही माझ्याशी अशा शब्दांत कशा बोलू शकता’, असा प्रश्न विचारला. सोनिया व स्मृती इराणी यांच्यामध्ये शाब्दिक वाद होत असल्याचे पाहून सुप्रिया सुळे, महुआ मोईत्रा आदी खासदारांनी सोनियांना बाजूला नेले. ‘सभागृहात न बोलता आपण बाहेर जाऊ’, असे सोनियांना सांगितले. त्यानंतर सोनिया गांधी सभागृहाबाहेर निघून गेल्या. माफीनाम्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर, ‘अधीर रंजन यांनी माफी मागितली आहे’, असे सोनिया म्हणाल्या. गोंधळानंतर लोकसभा दुपारी ४ पर्यंत व त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.

मोदी-इराणी यांनी सोनियांची माफी मागावी- काँग्रेस

सोनियांना धक्काबुक्की करण्याचा, त्यांच्यावर ओरडण्याचा आणि त्यांना शारीरिक इजा पोहोचवण्याचा प्रयत्न भाजपच्या सदस्यांनी केला. सोनिया गांधी दुखापतीही झाली असती, असा दावा काँग्रेसच्या खासदार गीता कोडा यांनी केली. पंतप्रधान मोदी व इराणी यांनी सोनियांची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. सभागृहामध्ये सोनियांना भाजपच्या खासदारांनी घेराव घातला आणि लांडग्यांच्या झुंडीप्रमाणे ते ७५ वर्षांच्या ज्येष्ठ महिलेविरोधात आक्रमक झाले होते. सोनिया दुसऱ्या ज्येष्ठ महिलेशी (पीठासीन अधिकारी असलेल्या) संवाद साधत होत्या, असे ट्वीट तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केले. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे लोकसभेतील वर्तन अत्यंत आक्षेपार्ह व अपमानास्पद होते. पण, त्यांना सभापती सज्जड समज देतील का? नियम फक्त विरोधकांसाठी आहेत का, असे प्रश्न उपस्थित करत काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी भाजपवर टीका केली. लोकसभेत पाहायला मिळालेली दृश्ये दुर्दैवी म्हणावी लागतील. सभागृह तहकूब झाल्यानंतर सोनिया गांधी यांच्या विरोधात अनावश्यक घोषणाबाजी ऐकून धक्का बसला. सभागृहामध्ये सर्व सदस्यांचे वर्तन योग्य असले पाहिजे, ती जबाबदारी सदस्यांची असते. सभागृहाची प्रतिष्ठा सांभाळली पाहिजे, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

इराणी, सीतारामन यांचा हल्लाबोल

सोनिया गांधी यांनी देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदी विराजमान झालेल्या महिलेचा अपमान करण्यासाठी काँग्रेसच्या खासदारांना प्रोत्साहित केले आहे. सोनिया आदिवासी विरोधी, दलितविरोधी आणि स्त्रीविरोधी आहेत, असा शाब्दिक हल्लाबोल केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी लोकसभेत केला. अंधीर रंजन यांच्यावर टीका करताना भाजपने सोनियांनाही लक्ष्य केले. सोनिया स्वत: महिला असूनही त्यांनी आपल्या पक्षाच्या नेत्याला असे आक्षेपार्ह बोलू दिले. सोनिया गांधी यांनी राष्ट्रासमोर येऊन राष्ट्रपतींचा अपमान केल्याबद्दल माफी मागावी, अशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत टिकेची झोड उठवली.

राष्ट्रपतींची माफी मागू- अधीर रंजन

मी राष्ट्रपतींची माफी मागेन. त्यासाठी मी त्यांच्याकडे वेळ मागितली आहे. पण मी पाखंडी भाजपची माफी मागणार नाही. मी बंगाली असून मी अस्खलित हिंदी बोलू शकत नाही. मी चुकीचा शब्द फक्त एकदाच उच्चारला. राष्ट्रपतींचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता. मी ते बोललो. मी चूक केली हे लक्षात येताच मी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना शोधून स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत ते निघून गेले होते, असे अधीर रंजन म्हणाले. विजय चौकात केंद्र सरकारवर टीका करताना अधीर रंजन यांनी ‘’राष्ट्रपत्नी’’ असा उल्लेख केला होता.