लखनऊ : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी शनिवारी त्यांच्या पक्षाच्या ‘प्रतिज्ञा यात्रांना’ उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथून हिरवा झेंडा दाखवला. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपला पक्ष सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

२३ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या काळात बाराबंकी ते बुंदेलखंड, सहारनपूर ते मथुरा आणि वाराणसी ते रायबरेली अशा तीन मार्गांवर या यात्रा ‘हम वचन निभायेंगे’ अशा घोषणेसह फिरणार आहेत.

विधानसभा निवडणुकीत महिलांसाठी ४० टक्के जागा राखून ठेवण्याचे प्रियंका यांनी यापूर्वी जाहीर केले होते. बारावी पास विद्यार्थिनींना स्मार्टफोन आणि पदवीधर विद्यार्थिनींना स्कूटी देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करणे, धान व गव्हासाठी क्विंटलला २५०० रुपयांचा, तर उसाला प्रति क्विंटल ४०० रुपयांचा किमान हमीभाव, २० लाख लोकांना सरकारी नोकऱ्या, करोनाचा फटका बसलेल्या कुटुंबांना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत अशी आश्वासने पक्षाने शनिवारी दिली. सत्तेवर आल्यास विजेचे बिल निम्म्याने कमी करण्याचेही आश्वासन काँग्रेसने दिले आहे.

कृषी धोरणाचा फेरविचार करा : वरुण गांधी

नवी दिल्ली : धानाचे पीक विकण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्यामुळे उत्तर प्रदेशातील एक   धानाच्या पिकाचा ढीग पेटवून देत असल्याची एक दृश्यफीत (व्हिडीओ क्लिप) ट्विटरवर शेअर करतानाच, सरकारने कृषी धोरणाचा फेरविचार करावा अशी मागणी भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी शनिवारी केली.