Congress claims Instagram suppressed Rahul Gandhi’s content : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यासोबत शेअर केलेले एक रील आणि फोटो पोस्ट इंस्टाग्रामने “ब्लॉक” केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) तयार केलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा करत ही कारवाई केल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. परंतु, केंद्र सरकारने हे आरोप फेटाळून लावले असून, ही समस्या प्लॅटफॉर्मच्या तांत्रिक चुकीमुळे झाल्याचे स्पष्ट केले आहे.
तमिळनाडूमध्ये काँग्रेसने ‘टीव्हीके’ (TVK) पक्षाला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा दिल्यानंतर, रविवारी चेन्नई येथे पार पडलेल्या विजय यांच्या शपथविधी सोहळ्याला राहुल गांधी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर काही फोटो आणि एक रील शेअर केली होती. राहुल गांधींचे सहकारी श्रीवत्स यांनी ‘X’ वर दावा केला की, शपथविधी सोहळ्यातील राहुल गांधी आणि विजय यांची रील आणि फोटो पोस्ट इंस्टाग्रामने ब्लॉक केली होती. त्यांच्या मते, या रीलला एका तासात १.२ कोटी (१२ दशलक्ष) व्ह्यूज मिळाले होते, तर फोटो पोस्ट ४.६ कोटी युजर्सपर्यंत पोहोचली होती.
श्रीवत्स यांनी आरोप केला की, “मेटाने खाते का अॅक्सेस करता येत नाही, याचे कोणतेही कारण दिलेले नाही. हा ‘तांत्रिक बिघाड’ MeitY च्या नियमांमुळे झाला आहे! राहुल गांधींचे सोशल मीडिया पोहोच, यूट्यूब व्ह्यूज आणि इंस्टाग्राम फॉलोअर्स बराच काळ दाबले जात आहेत.”
इंस्टाग्राम स्टोरी ब्लॉक
ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय सचिव रुचिरा चतुर्वेदी यांनीही आरोप केला की, मेटाने प्रथम राहुल गांधी आणि विजय यांचा व्हायरल व्हिडिओ ब्लॉक केला आणि नंतर या ब्लॉकबद्दल विचारणा करणारी राहुल गांधींची इंस्टाग्राम स्टोरी देखील ब्लॉक केली. मात्र, सरकारने यात कोणताही हस्तक्षेप नसल्याचे स्पष्ट केले आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले की, मंत्रालयाला या कारवाईशी जोडणारे दावे चुकीचे आहेत.
सरकारचं स्पष्टीकरण काय?
पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना मंत्रालयातील एका सूत्राने सांगितले, “MeitY चा या कारवाईशी काहीही संबंध नाही. प्लॅटफॉर्मच्या अंतर्गत यंत्रणेने चुकून ही पोस्ट ब्लॉक केली होती, जी आता पुन्हा पूर्ववत करण्यात आली आहे.” सरकारी सूत्रांनी सांगितलं की, ही समस्या इंस्टाग्रामच्या अंतर्गत मॉडरेशन सिस्टममुळे उद्भवली होती, मंत्रालयाने दिलेल्या कोणत्याही निर्देशामुळे नाही. तो व्हिडिओ आता पुन्हा उपलब्ध झाला आहे.
